शिक्षणाचाही ‘डीपी’ हवा - तावडे
By admin | Published: June 27, 2015 02:11 AM2015-06-27T02:11:20+5:302015-06-27T02:11:20+5:30
शहरातील लोकसंख्या जशी वाढते त्यानुसार ठरावीक कालावधीत विकास आराखडा (डीपी) तयार केला जातो; शिक्षणाबाबतही अशी संकल्पना असायला हवी.
पुणे : शहरातील लोकसंख्या जशी वाढते त्यानुसार ठरावीक कालावधीत विकास आराखडा (डीपी) तयार केला जातो; शिक्षणाबाबतही अशी संकल्पना असायला हवी. शिक्षणाचा विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात राज्यातील विद्यापीठांतील अॅकॅडमिक कौन्सिलाला सूचना करणार आहोत, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
पुण्यात विविध कार्यक्रमांनिमित्त आले असता तावडे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की अभ्यासक्रमात कालानुरूप बदल करीत नव्या संकल्पना आणणे आवश्यक आहे. त्यामध्ये लवचिकता असायला हवी. एखाद्या अभ्यासक्रमासाठी सध्या किती मागणी आहे, उद्योगांची गरज आहे, त्याअनुषंगाने शैक्षणिक संस्थांमध्ये कोणते अभ्यासक्रम असायला हवेत याचा विचार करायला हवा. विद्यापीठांच्या अॅकॅडमिक कौन्सिलमध्ये लवचिकता आणण्याबाबत त्यांना सूचना केली जाईल. यासाठी कोणतीही समिती नेमण्याची गरज नाही. त्या त्या पातळीवर यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
कोणत्याही परीक्षेत एका प्रश्नाला एकच उत्तर ही पद्धत चुकीची असून एका प्रश्नाला अनेक उत्तरे ही पद्धतच योग्य आहे, असे तावडे यांनी सांगितले.
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप तसेच तीन मंंत्र्यांचे स्टिंग आॅपरेशन अधिवेशनात उघड करणार असल्याच्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत तावडे म्हणाले, की पंकजा मुंडे यांच्याबाबत स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सरकारचे काही चुकत असेल तर विरोधकांनी जरूर बोलावे. पण विनाकारण आरोप होत असतील तर त्यावर नक्कीच आक्षेप घेतला जाईल.