नवी दिल्ली - राज्यसभेत सोमवारी आयुष मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली. या चर्चेत शिवसेना खासदारसंजय राऊत यांनीही सहभाग नोंदवला. ज्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथीला चालना देण्यासाठी विचारमंथन झालं. त्यावेळी खासदार राऊत यांनी कोंबडी आणि अंडी यावर गहन चर्चा केली. आदिवासी नागरिकांचा विचार केल्यास, कोंबडी ही शाकाहरी असल्याचे राऊत यांनी म्हटले. मला काही आदिवासींनी याबाबत माहिती दिल्याचेही ते म्हणाले.
आयुर्वेद हा प्राचीन परंपरेचा भाग असून या मंत्रालयासाठी जास्तीच्या निधीची मागणीही राऊत यांनी केली. जगभरात योग आणि आयुर्वेदाचा प्रसार आवश्यक आहे आणि यासाठी 1500 कोटींऐवजी किमान 10 हजार कोटींच्या निधीची तरतूद आवश्यक आहे. यातून गरीबांना उपचार मिळतील. आजही आपल्याला चांगले आयुर्वेदिक डॉक्टर पाहायला मिळत नाहीत, असं ते म्हणाले एका आदिवीसीने मला कोंबडी आयुर्वैदीक असून शाकाहरी असल्याचे सांगितले, असेही राऊत यांनी म्हटले. नंदुरबार येथे गेल्यानंतर जेवणात कोंबडीचा बेत होता. मात्र, मी नकार दिल्यानंतर, ही आयुर्वैदीक कोंबडी असून या कोंबडीमुळे तुमचे रोग दूर होतील, असे त्या आदिवासीने मला सांगिल्याचे राऊत यांनी संसदेत म्हटले.
हरियाणातील काही लोकं माझ्याकडे आले होते. त्यावेळी त्यांनी शाकहरी अंड्यांवर संशोधन करत असल्याचे सांगितले. तसेच, मला काही अंडीही दाखवून ही शाकाहारी असल्याचे म्हणाले. कोंबडींना आयुर्वैदीक खाद्य दिल्यास, त्या शाकाहरी अंडी देत असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. त्यामुळे, अंडी ही शाकाहरी की मांसाहरी याबाबत आयुष मंत्रालयानेच सांगावं? असे खासदार राऊत यांनी म्हटले.