दोन्ही भाऊ पुण्यात...आपण व्यस्त पिण्यात
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी मंत्री गिरीश महाजन व आमदार एकनाथ खडसे प्रचारात सहभागी झाले आहेत. खडसेंनी काही बैठका घेतल्या, तर महाजन मतदानपूर्व तयारीत व्यस्त आहेत. तेव्हा या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यांची चर्चाही तळीरामांच्या गुत्त्यावर सुरू आहे. रात्री दारू रिचवत बसणाऱ्या चार- चौघांच्या टेबलाजवळून महाजन यांचा समर्थक जाताना दिसला. तेव्हा "भाऊ, कुठे गेले रे' म्हणत एकाने प्रश्न विचारला. तेव्हा त्या समर्थकाने "भाऊ पुण्यात प्रचाराला' असे उत्तर आले. काही वेळानंतर खडसे समर्थकही आला. त्याला तोच प्रश्न विचारला. तेव्हा त्यानेही तेच उत्तर दिले. तेव्हा झिंगबाजच्या तोंडाला कविता फुटली... अन् तो सहजच म्हटला... दोन्ही भाऊ पुण्यात.... आपण व्यस्त पिण्यात... हे ऐकून शेजारचा टेबलही 'वाह क्या बात है' म्हणत गेला.
नेते जोमात, कार्यकर्ते कोमात
राजकीय पक्षांची आंदोलने म्हटली . म्हणजे आता कार्यकर्त्यांच्या अंगात घुसायला लागली आहेत. सरकारने राजकीय आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला म्हणतात. पण, स्थानिक पातळीवर कागद पोहोचलेला नाही. त्यामुळे आंदोलकांच्या कोर्टातील वाऱ्या थांबलेल्या नाहीत. यात नेते मात्र, कुठेच दिसत नाहीत. कार्यकर्त्यांचा जराही विचार करत नाहीत. यावरून दोन कार्यकर्ते संताप करत होते. चमको आंदोलने असली म्हणजे आपल्या नेत्यांना सांगा, सगळ्यात पुढे तेच असतात आणि अंगावर गुन्हे घ्यायचे म्हटले की, आपली नावे टाकतात. यापुढे आंदोलन बिंदोलन बंद. नेत्यांना सांगायचे तुम्ही तुमचे मॅनेज करा. आपलं तर ठरलं, इथून पुढे कोणत्याच आंदोलनात जाणार नाही. दुसऱ्या कार्यकर्त्याने दृढनिश्चय सांगून टाकला.
(या सदरातील मजकूर कुंदन पाटील व अमित महाबळ यांनी लिहिला आहे. मजकुराचा क्रम नामावलीनुसार असेलच, असे नाही)