मुंबई - अलीकडेच ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाई यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भूषण देसाईंच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजपा नेत्यांनी विरोध केला होता. भ्रष्टाचारी प्रतिमा असलेल्या भूषण देसाईंना प्रवेश नको अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर आज विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी भूषण देसाई यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचं कारण सांगत शिवसेना-भाजपा सरकारला घेरले.
आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, भूषण देसाई यांनी वडिलांची साथ का सोडली? अनेक वर्ष त्यांनी MIDC चं काम अप्रत्यक्षपणे सांभाळले. पण एकाएकी असं का वाटले. त्याचे कारण म्हणजे भूषण देसाई यांचे ४ लाख १४०० स्क्वेअर मीटर औद्योगिक भूखंडाचे अवैध वाटप केले. त्यात जवळपास ३ हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी करत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. यावर उद्योगमंत्र्यांनी उच्चस्तरीय कमिटी स्थापन करून चौकशी अहवाल तयार केला जाईल असं म्हटलं होते. आज तो अहवाल सभागृहात मांडण्यात येणार आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच याच भूषण देसाईंबाबत खासदार इम्तियाज जलील, आमदार अतुल भातखळकर यांनी जमीन घोटाळ्याचा आरोप केला. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. उच्चस्तरीय समिती नेमली. भाजपा आमदार मागे लागले. चौकशी सुरू झाली. सुभाष देसाईंचा मुलगा आहे. विरोधी पक्षाचे ते नेते आहे म्हणून ही पाऊले उचलली. आता हे प्रकरण ईडीकडे जाणार आहे असा निरोप भूषण देसाईंकडे पाठवला. पण तो आता पावन झाला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या आश्रयाखाली आला. तुमच्याकडे आला तर सगळं संपलं. माझ्यावर भूखंडाचे आरोप झाले. एक रुपयाचा माझा संबंध त्याच्याशी नाही. तरी माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला. मला लावलेला न्याय तोच भूषण देसाईंना लावणार का असा संतप्त सवाल एकनाथ खडसेंनी सभागृहात सरकारला विचारला.