Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 03:02 PM2024-11-29T15:02:43+5:302024-11-29T15:04:25+5:30
Eknath Shinde Dare Village Tour News: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर : दरे बुद्रुकमध्ये दाखल होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि काळजीवाहू मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जेव्हा राज्यात काही अडचणीची स्थिती निर्माण होते. याशिवाय राजकीय उलटफेर सुरु असतात. त्यावेळी या भाऊगर्दीतून एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे या गावी दाखल होतात. त्यांना येथे शांतता आणि समाधान मिळते. शिवाय शेताकडे आल्यानंतर वेगळी ऊर्जा मिळत असते. त्यामुळे ते याठिकाणी येथे पसंत करतात. आत्तापर्यंत साधारणत: सहा ते सात वेळा अडचणीच्या काळात गावाकडे आले आहेत.
राज्यात गतनिवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळून देखील शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते. पण, उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्री झाल्याने नाराज झालेले एकनाथ शिंदे हे दरे मुक्कामी दाखल झाले होते.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येही मध्यंतरी धूसफूस सुरु झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावाकडे येऊन मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता.
ठाणे येथील हॉस्पिटलमधील घटना घडली त्यावेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे मुक्कामीच होते. त्याच ठिकाणाहून त्यांनी सर्व परिस्थिती हाताळली होती. त्यानंतर ते ठाण्याकडे रवाना झाले होते.
सध्या देखील राज्यात मुख्यमंत्री कोण याबाबत चर्चा सुरु आहेत. गुरुवारीच मुख्यमंत्री दिल्लीत होते. रात्री उशिरापर्यंत अमित शहा यांच्याशी त्यांची चर्चा झाली. त्यानंतर ते मुंबईत परतले. तर आज दुपारी पुन्हा ते सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या गावी दाखल होत आहेत.
गावाकडे आल्यावर शांतता मिळते
निसर्गाचे अलोट सौदर्य लाभलेल्या दरे या गावाता आल्यानंतर एक प्रकारची शांतता आणि समाधान मिळते. त्याबरोबरच शेतातील पिकांकडे पाहून मनही डोलायला लागते. असा अनुभव त्यांना येत असतो. त्याबरोबर गावच्या देवी देवतांच्या यात्रांच्या काळातही सर्वांची भेट होत असते त्यामुळे गावाकडे येत असल्याचे एकनाथ शिंदे नेहमी सांगत असतात. सध्या देखील राज्याच्या राजकारणातील उलथापालथीमुळे शांततेच्या शोधात ते गावाकडे आले असावेत अशी शक्यता वर्तविली जात आहे.