Eknath Shinde next CM Devendra Fadnavis: शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील अशी मोठी घोषणा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनातील पत्रकार परिषदेत केली. शिवसेना, महाविकास आघाडी विरूद्ध बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा पहिला अध्याय मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे संपला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत आले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून राज्यपालांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक भक्कम सरकार देण्यात येईल अशी जोरदार चर्चा काल रंगली होती. राजभवनात शपथविधीची वेळ ठरली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अशी शपथ घेतील असेही ठरल्याचे सांगितले जात होते. पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयाची तुलना धोनीने फायनलमध्ये जोगिंदर शर्माला गोलंदाजी दिल्यासारखाच असल्याची चर्चा आहे.
२००७ चा टी२० विश्वचषक.. दक्षिण आफ्रिकेतील मैदान.. भारत विरूद्ध पाकिस्तानचा फायनलचा सामना.. शेवटच्या षटकात पाकिस्तान सहज जिंकू शकेल अशी स्थिती.. अशा वेळी भारताकडून कसलेला गोलंदाजी शेवटचे षटक टाकेल असे वाटत होते. पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळेच घडले. जोगिंदर शर्मा हा तुलनेने नवखा असलेला गोलंदाज बॉलिंगला आला. त्याच्या संथ गती गोलंदाजीला फारसा वापर पाकिस्तानी फलंदाजाला करता आला नाही. त्यामुळे जोगिंदर शर्माने सामना जिंकवला आणि पाकिस्तानच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरलं. धोनीच्या या अनपेक्षित निर्णयाचे गणित नंतर साऱ्यांना पटले. तसंच काहीसं महाराष्ट्राच्या राजकारणात झालं.
महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांनी नाराजी असल्याचे सांगत बंड केले. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू होते. पण त्यांच्याच नेतृत्वाखाली मोठं बंड महाराष्ट्रात झालं. शिवसेनेकडून या बंडखोरांना परत येण्याचे आवाहन करण्यात आले. पण अखेर बंड न शमल्याने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत मंत्रिमंडळ बरखास्त केले. यावेळी सातत्याने शिवसेनेकडून सांगण्यात येत होते की भाजपासोबतच्या सरकारमध्ये तुम्हाला केवळ उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे, ते तर आम्ही इथेही देतो. पण शिंदे गटाने ऐकलं नाही. अखेर ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी अतिशय भावनिक भाषण केले. त्यामुळे साहजिकच ठाकरे यांना जनतेची सहानुभूती मिळाली. पण त्यापुढे जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी कुणाच्याही ध्यानी-मनी नसताना आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाचा अनुभव नसलेल्या एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केले. ही त्यांची आणि भाजपाची अतिशय अनपेक्षित खेळी ठरली.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्याने सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शिवसैनिकाच्यानंतर पुन्हा शिवसैनिकच मुख्यमंत्री झाला. संजय राऊत म्हणत होते की शिवसेनेचा मुख्यमंत्री तुम्ही करून दाखवणार आहात का? ती गोष्टदेखील झाली. फडणवीस आणि शिंदे गटाने करून दाखवलं. पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेच असतील या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले. तसेच, हे सरकार भाजपाने पाडलेले नाही. आधीही शिवसेनेचा मुख्यमंत्री होती, यापुढेही शिवसेनेचाच मुख्यमंत्री पुढील अडीच वर्षे पदावर बसेल ही गोष्ट पूर्ण झाल्याने शिंदे गटावर टीका करणारे अनेक शिवसैनिक या गटाबाबत सामंजस्याने विचार करू लागल्याचेही दिसले. त्यामुळे फडणवीसांचा हा मास्टरस्ट्रोक म्हणजे राजकारणाचा वर्ल्ड कप जिंकल्यासारखेच झाले.