राज्यातील पुढील मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची रूपरेषा ठरवण्यासाठी राज्यातील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या महायुतीच्या नेत्यांची अमित शाहांसोबत एक महत्त्वाची बैठक काल रात्री दिल्लीमध्ये झाली. त्या बैठकीवेळी अमित शाह यांचं स्वागत करतानाचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये देवेंद्र फडणवीस हे प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याने अमित शाह यांना भेटत असल्याचे तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडलेला दिसत आहे. त्यावर चर्चांना उढाण आलं आहेत. आता एकनाथ शिंदे यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी तेव्हाही खूश होतो आणि आजही खूश आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांचे अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीवेळचे चिंतीत चेहरा असलेले फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याबाबत प्रसारमाध्यमांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, आता माझा चेहरा कधी गंभीर, कधी हसरा असतो हे तुम्ही ठरवता, ते तुम्हीच ठरवा. मी आजही खूश आहे. कारण गेली दोन अडीच वर्षे आम्ही जे काम केलं, लाडकी बहीणसारख्या ज्या कल्याणकारी योजना आणल्या त्याचा चांगला रिझल्ट आम्हाला या निवडणुकीत पाहायला मिळाला. राज्यातील निवडणुकांच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधीही एवढं मोठं बहुमत मिळालं नव्हतं. याचा अर्थ सरकरावर जनता खूश आहे आणि सरकारच्या कामावर जनता समाधानी आहे. यातच आमचं समाधान आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रातील सरकारस्थापनेबाबत भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत काल रात्री एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत भावी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील भागीदारीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे.