Eknath Shinde: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिंदेंची नजर! १५ आमदार फोडणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 08:37 AM2022-07-17T08:37:44+5:302022-07-17T08:38:28+5:30
राज्याच्या राजकारणात ५० आमदारांचा पाठबळ उभं करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि आपलं राजकीय वजन त्यांनी दाखवून दिलं.
मुंबई-
राज्याच्या राजकारणात ५० आमदारांचा पाठबळ उभं करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि आपलं राजकीय वजन त्यांनी दाखवून दिलं. आता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांची नजर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांवर असल्याचं बोललं जात आहे. कारण भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून तब्बल २०० आमदार मतदान करतील असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण येऊ लागलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 'मिशन-२००' हाती घेतलं आहे. सध्या भाजपा आणि शिंदे गटाचे मिळून एकूण १७० आमदार आहेत. तर शिवसेनेनं मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे ही संख्या १८५ आमदारांपर्यंत पोहोचली आहे. मग शिंदे यांनी जाहीर केलेल्या २०० आमदारांच्या पाठिंब्याचं लक्ष्य गाठण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांवर मुख्यमंत्र्यांची नजर आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी शिंदे यांना अजूनही १५ आमदारांच्या मताची गरज पडणार आहे. त्यामुळे ते यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर नजर ठेवून आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये शिंदे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
काँग्रेसचे विधानसभेमध्ये ४४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी लागणारे आणखी १५ आमदार कोणत्या पक्षाचे असतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे.