Eknath Shinde: 'धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडेच', शहाजीबापूंनी उद्धव ठाकरेंसाठी सूचवलं 'हे' चिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:38 PM2022-08-02T12:38:21+5:302022-08-02T12:41:14+5:30
Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेगट यांच्या धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईवरुन कायदेशीर सामना सुरू आहे
मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गटानं बंडाळी करून शिवसेनेला मोठा धक्का दिला. त्यानंतर, राज्यात सत्तापरिवर्तन होऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारली. दरम्यान, राज्यात भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन झालं. असं असलं तरी हा विषय आता सर्वोच्च न्यायालयाकडे गेला आहे. दुसरीकडे शिवसेना आणि शिवसेनेचं पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणासाठी एकानाथ शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिल आहे. त्यावरुन सामना रंगला असताना आता शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंचाच असल्याचं म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेगट यांच्या धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईवरुन कायदेशीर सामना सुरू आहे. त्यामुळे, शिवसेना पक्ष कोणाकडे राहणार, आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार याची चर्चा होत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी धाव घेतली आहे. याबाबत, स्वत: एकनाथ शिंदेंनीही जाहीर सभेत सांगितलं होतं. आता, शिंदे गटातील आमदार आणि काय झाडी... काय डोंगार... काय हाटील डायलॉगफेम शहाजीबापू पाटील यांनी धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडेच राहणार असल्याचं म्हटलं आहे. आगामी निवडणुकीत आम्हीच धनुष्यबाणाच्या चिन्हाचे फॉर्म उमेदवारांना देणार. कारण, ते चिन्ह आमच्याच शिवसेनेला मिळेल. उद्धव ठाकरेंनी दुसरं चिन्ह घ्यावं, त्यांनी ढाल-तलवार हे चिन्ह घ्यावे, लढाऊ चिन्हांची काय कमी हाय का, असेही ते म्हणाले.
शहाजीबापू पाटील यांनी एका वृत्तावाहिनीशी बोलताना आता आमचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत. त्यामुळे, यापुढील निवडणुकांवर आमच्याकडून उद्धव ठाकरेंचा फोटो बॅनरवर लावला जाणार नाही, एकनाथ शिंदेंचा लावला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच, आदित्य ठाकरेंच्या सुरू असलेल्या सभा आणि त्यांच्या भाषणावर बोलतानाही त्यांनी आदित्य यांच्यावर टिका केली. आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांची कॉपी करू नये, बाळासाहेबांनाच ती ठाकरी भाषा शोभत होती, उद्धव आणि आदित्य ठाकरेंना ती भाषा शोभत नाही, असेही पाटील यांनी म्हटले.
संजय राऊत दोषी म्हणून अटक
संजय राऊत दोषी असतील म्हणून त्यांना अटक झाली असावी. ईडीचा कुठलाही दोष नाही. त्यांना अटक केली त्यांचा आर्थिक व्यवहार पुढे येतील. आज महाराष्ट्र किरकिऱ्या कारट्याकडून शांत झाला असेल. उद्धव ठाकरेंनी हा आवाज बंद केला नाही तो ईडीने केला. ७-८ वर्ष त्यांचे दर्शन होत नाही आता निवांत राहा. शांत राहा अशा शब्दात शहाजी पाटलांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.