लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिकामाचा शीण आल्याने आजारी पडले असून त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी गुरुवारी दिल्लीला रवाना झाले.
शिंदे यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी ११ ला, तर राज्यातील पीकपाणी परिस्थितीबाबत दुपारी १ ला सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेणार होते; पण या दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आल्या. त्यांनी नंदनवन या शासकीय बंगल्यावर आराम केला.
फडणवीस हे दुपारी दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे समजते. भाजपमध्ये काही ज्येष्ठांना बाजूला ठेवून नव्यांना संधी देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. फडणवीस यांनी जुने-नवीन यांचे संतुलन ठेवा, असा आग्रह धरल्याची माहिती आहे. ३५ दिवसांपासून अडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आजही निघाला नाही. मात्र, फडणवीस यांच्या आजच्या दिल्ली बैठकीत भाजपची नावे अंतिम झाल्याची माहिती आहे.
शिंदे गटाकडून अधिकची मंत्रिपदे आणि विशिष्ट खात्यांचा आग्रह धरला जात असल्याची आणि विस्तार लांबणीवर पडण्याचे तेही एक महत्त्वाचे कारण असल्याचीही माहिती आहे. फडणवीस हे दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटले तेव्हा यासंदर्भात तिथूनच दूरध्वनीवर शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
८ ऑगस्टनंतरच विस्तार शक्य विस्तार ५ ऑगस्टला होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. ६ तारखेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीला जाणार आहेत. ८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात राज्यातील राजकीय पेचावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता ८ ऑगस्टनंतरच विस्तार केला जाईल, अशी शक्यता आहे. लांबत चाललेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे आता भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता वाढत आहे.
शिवसेनेचा धनुष्यबाण तूर्त शाबूत!शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर सध्या कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.