पत्नीची छेड काढणा-या तरुणाची निर्घृण हत्या, औरंगाबादमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 09:13 PM2017-09-01T21:13:19+5:302017-09-01T21:18:20+5:30
पत्नीची छेड काढल्याच्या कारणावरुन 19 वर्षीय तरुणाला घराबाहेर बोलावून नेत त्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची थरारक घटना
औरंगाबाद, दि. 1 - पत्नीची छेड काढल्याच्या कारणावरुन 19 वर्षीय तरुणाला घराबाहेर बोलावून नेत त्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची थरारक घटना गुरूवारी रात्री चिंचोळी येथील तोळानाईक तांडा(ता. औरंगाबाद)येथे घडली. हत्या करून पसार झालेल्या आरोपीला चिकलठाणा पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या 12 तासात बेड्या ठोकण्यात यश आले.
रवींद्र कल्याण जाधव(19,रा.तोळानाईक तांडा, चिंचोळी)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रामेश्वर शिवलाल पवार(21,रा. तोळानाईक तांडा)असे आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती देताना चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि मयत हे परस्परांचे नातेवाईक आहे. रविंद्र आयटीआयचा विद्यार्थी होता तर रामेश्वर हा औरंगाबादेत बी.ए.प्रथम वर्षात शिकतो आणि पोलीस भरतीची तयारी करायचा. त्याचे लग्न झालेले असून तो गणेशोत्सवानिमित्त सहपत्नीक चिंचोळी तांडा येथे आला होता. गुरूवारी रात्री रविंद्रने त्याच्या पत्नीची छेड काढल्याचे त्यास काळाले. यामुळे तो रागाने संतप्त झाला आणि त्याला शोधत रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विष्णू जाधव याच्या घरी गेला. तेथे रविंद्र आणि त्याचा मावसभाऊ नवनाथ जाधव यांच्यासोबत टिव्ही पहात बसला होता. यावेळी काम आहे, जरा बाहेर ये असे तो दारातूनच रविंद्रला म्हणाला. यानंतर तो रविंद्रला त्याच्या घरापासून काही अंतरावर अंधारात घेऊन गेला. तेथे त्याने रविंद्रच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर त्याचा मृतदेह त्याच्या घरापासून सुमारे ५०० मिटरवरील ज्वारीच्या शेतात फेकून देऊन तो तेथून पसार झाला. रविंद्र आणि रामेश्वर यांचे भांडण झाल्याची बाब गावातील त्याच्या नातेवाईकांना समजली. यांनतर ते त्यास शोधत असताना ज्वारीच्या शेतात गंभीर जखमी आणि बेशुद्धावस्थेत रविंद्र पडलेला दिसला. त्यांनी रात्री त्यास एका वाहनातून प्रथम चिकलठाणा पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्यांना तात्काळ घाटीत नेण्याचे सांगितले. घाटीतील डॉक्टरांनी रविंद्र यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
तीन पथकांनी शोधले आरोपीला-
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी तात्काळ तीन पथके स्थापन करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आमले,सहायक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण,संदीप सोळुंके,तुपे, कर्मचारी अनिल जायभाये, दीपक सुरासे, अर्जून राठोड, नामदेव इजलकुंठे, सुभाष टिमकीकर यांच्या पथकाने रात्रभर आरोपीचा शोध घेतला.