...म्हणून पालिका निवडणुका पुढे ढकलल्या; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत राज ठाकरेंनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 08:26 PM2022-03-09T20:26:23+5:302022-03-09T20:28:54+5:30
ओबीसींचं आरक्षण रद्द झालं हे निवडणुका पुढे ढकलण्यामागचं कारण नाही; राज ठाकरेंनी सांगितलं खरं कारण
पुणे: राज्यातील महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यामागचं खरं कारण ओबीसींचं आरक्षण नव्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नाही, हे निवडणुका पुढे ढकलण्यामागचं प्रमुख कारण असल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. मनसेच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त ते पुण्यात बोलत होते. ओबीसींचं आरक्षण केवळ लोकांना सांगण्यापुरतं असल्याचं राज यांनी म्हटलं.
निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचं मी माझ्या सहकाऱ्यांना नोव्हेंबरपासूनच सांगत होतो. निवडणुका जवळ आल्या की जाणवतं. निवडणूक चढायला लागते. मला तसं काहीच जाणवत नव्हतं. ओबीसी समाजाचं आरक्षण गेल्यानं निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या हे कारण खोटं आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती निवडणुका पुढे ढकलण्यामागचं खरं कारण आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
निवडणुका पुढे ढकलणं सरकारसाठी सोयीचं आहे. तीन महिन्यांनी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांनी निवडणूक म्हणजे जून महिना उजाडेल. पावसात निवडणुका घेणार आहात का, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. पालिकांची मुदत संपली की प्रशासक नेमायचा. तो आपल्या मर्जीतला नेमला की मग पालिका आपल्याच हातात, असा सरकारचा डाव असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
निवडणुका लोकांना हव्यात का याचा राजकीय पक्षांनी जरा कानोसा घ्यावा. लोकांना काहीच वाटत नाही. तुमच्या निवडणुका झाल्या काय आणि नाही झाल्या काय लोकांना त्याचं काहीच वाटत नाही, हे कानोसा घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका लागल्या असत्या तरीही लोकांच्या आयुष्यात काही बदल झाला नसता. निवडणुका आता थेट दिवाळीनंतरच लागतील, असा अंदाज राज यांनी वर्तवला.