मागणी घटल्याने सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्पातून विजेचे उत्पादन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 01:19 PM2019-11-07T13:19:09+5:302019-11-07T13:20:49+5:30
एनटीपीसीचे महाप्रबंधक नवकुमार सिन्हा यांनी दिली माहिती; पावसामुळे विजेचा वापर झाला कमी
सोलापूर : सध्या विजेची मागणी घटली आहे. देशभरात हीच स्थिती असून पॉवरग्रीडकडून वीज स्वीकारली जात नसल्याने फताटेवाडी येथील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातून विजेचे उत्पादन थांबवण्यात आल्याची माहिती एनटीपीसीचे महाप्रबंधक नवकुमार सिन्हा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
फताटेवाडी येथील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिन्हा बोलत होते. पावसामुळे ७ आॅक्टोबरपासून विजेचा वापर साहजिकच कमी झाला. मागणीही घटली. उत्पादित केलेली वीज विकली जात नव्हती, त्यामुळे उत्पादन बंद करणे हाच एकमेव पर्याय एनटीपीसीसमोर होता. अन्य वीज निर्मिती केंद्रातही यापेक्षा वेगळी स्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले़ १५ नोव्हेंबरनंतर पुन्हा विजेचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता नवकुमार सिन्हा यांनी व्यक्त केली.
एनटीपीसी हायड्रोपॉवर, कोलपॉवर आणि सोलर एनर्जी क्षेत्रात सध्या काम करते़ देशातील सर्वात मोठी वीज उत्पादित करणारी कंपनी असून एकूण वीज उत्पादनात २३ टक्के उत्पादन करून आर्थिक, सामाजिक विकासात एनटीपीसीचे योगदान मोठे असल्याचा दावा सिन्हा यांनी केला. यापुढच्या काळात सोलर एनर्जीच्या क्षेत्रात ही कंपनी अधिक काम करणार आहे. लवकरच सोलापूर युनिटमध्येही सोलर एनर्जी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर वीज निर्मिती केंद्राची उत्पादन क्षमता १३२० मेगावॅट आहे़ या केंद्रातून वार्षिक ४० हजार मिलियन युनिटचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते़ आतापर्यंत ६०० मिलियन युनिट वीज निर्मिती करण्यात आली, उर्वरित काळात उद्दिष्ट साध्य करणे शक्य असल्याचे सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेला एनटीपीसीचे प्रकल्प महासंचालक रजत चौधरी, के. व्यंकटय्या, जॉन मथाई, विनय वानखेडे, दीपक शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
तापमान घटल्याचा दावा
एनटीपीसीमुळे सोलापूर शहर आणि परिसरातील तापमानात वाढ झाल्याची चर्चा गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे़ या चर्चेचे खंडन करताना फताटेवाडीच्या प्रकल्पात चारही दिशेला १२५ इतर क्षेत्रात तीन लाखांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे़ प्रकल्पातून धुराचे उत्सर्जन अतिशय कमी होते. प्रदूषण नियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली असून पर्यावरण मंत्रालयाशी ती आॅनलाईन जोडण्यात आली आहे़ एनटीपीसी प्रकल्प हरितपट्टा बनला असून तापमान वाढले नाही तर ते कमी झाल्याचा दावा महाप्रबंधक नवकुमार सिन्हा यांनी केला. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनीही याची कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले़
डिजिटलायझेशनसाठी तरतूद
- एनटीपीसीने होटगी स्टेशन,आहेरवाडी येथे पाण्याच्या उंच टाक्या, होटगी स्टेशन जि.प.शाळेच्या चार वर्गखोल्या,फताटेवाडीत दोन अंगणवाड्या,१५० शौचालये यासाठी जिल्हा परिषदेकडे २.१२ कोटी निधी वर्ग केला आहे.यंदा जि.प.च्या शाळेतील ७० वर्गखोल्यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व निधी) मधून १ कोटी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.