कोकण रेल्वेचे विद्युतीकरण ४ वर्षांत
By Admin | Published: November 3, 2016 05:23 AM2016-11-03T05:23:28+5:302016-11-03T05:23:28+5:30
कोकण रेल्वेचे दुहेरीकरण टप्प्याटप्प्यात केले जाणार असतानाच, आता याच मार्गावर विद्युतीकरणाचे कामही लवकरच हाती घेतले जाईल.
मुंबई : कोकण रेल्वेचे दुहेरीकरण टप्प्याटप्प्यात केले जाणार असतानाच, आता याच मार्गावर विद्युतीकरणाचे कामही लवकरच हाती घेतले जाईल. यासाठी चार वर्षात विद्युतीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कामाची निविदा प्रक्रिया दोन ते तीन महिन्यांत पार पाडली जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली.
कोकण रेल्वेचा प्रवास सुकर व वेगवान करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून दोन महत्त्वाच्या प्रस्तावांवर काम केले जाणार आहे. यातील संपूर्ण मार्गावरील वाहतुकीची क्षमता दुप्पट वाढावी, म्हणून टप्प्याटप्प्यात दुहेरीकरण जाईल आणि त्यासाठी एक वेगळा प्रस्ताव तयार केला जात आहे. प्रस्तावानुसार, ट्रॅकची व ट्रेनची संख्या वाढवणे, लूप लाइन वाढवण्यावर भर देण्यात येईल. हे काम पूर्ण करतानाच कोकण रेल्वेने विद्युतीकरणावरही भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, चार वर्षांत कोकण रेल्वेचे विद्युतीकरण केले जाणार आहे.
विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेला मोठे फायदे होतील. सध्या या रेल्वेचे इंजिन हे डिझेलवर सुरू आहे. त्यामुळे इंजिनातून निघणाऱ्या धुरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते आहे. विद्युतीकरण झाल्यास यातून सुटका होईल आणि पर्यावरणपूरक असा कोकण रेल्वेचा प्रवास होऊ शकेल. कोकण रेल्वेची वीजबचतही होण्यास मदत मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या मार्गावरील विद्युतीकरण करण्यास जवळपास ७२0 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले. विद्युतीकरण झाल्यास, कोकण रेल्वेला त्याचा चांगला फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)
>कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड ते ठोकूर असा ७४१ किलोमीटरचा मार्ग आहे.
यातील दुहेरीकरणाचे काम टप्प्याटप्प्यात केले जाणार आहे. त्याचप्रमाणे, विद्युतीकरणाचे कामही करण्याचा विचार कोकण रेल्वेचा आहे.