अकरावीची दुसरी यादी
By Admin | Published: July 4, 2016 04:53 AM2016-07-04T04:53:03+5:302016-07-04T04:53:03+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार आहे.
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार आहे. पहिल्या यादीतील एकूण ६२ हजार ३०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याने ते प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले आहेत.
वाणिज्य शाखेत प्रवेश मिळाल्यानंतरही ३८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. अकरावी प्रवेशाकडे पाठ फिरवणाऱ्या विद्यार्थ्यांत विज्ञान शाखेतील १६ हजार ६३६, तर कला शाखेतील ६ हजार ८४९ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. परिणामी, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय पहिल्या यादीत मिळाले नव्हते, अशा विद्यार्थ्यांना बेटरमेंटची संधी मिळण्याची शक्यता आहे.
याआधी प्रवेश मिळवण्यासाठी एकूण २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केले होते. त्यांपैकी १ लाख ८४ हजार ९७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्याच गुणवत्ता यादीत निश्चित झाले होते. मात्र केवळ १ लाख २१ हजार ९४३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश घेतल्याने उर्वरित विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले आहेत.
>दुसऱ्या यादीसाठी
७ हजार ९०३ नव्या जागा
दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी अल्पसंख्याक, व्यवस्थापकीय आणि इन हाउस कोट्यातील उरलेल्या ७ हजार ९०३ जागा जमा झाल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले. त्यात अल्पसंख्याक कोट्यातील ४ हजार ७५६, व्यवस्थापन कोट्यातील ५८३ आणि इन हाउस कोट्यातील २ हजार ५६४ जागा जमा झाल्या आहेत.