पुणे : एल्गार परिषदेच्या आयोजनामध्ये माओवाद्यांचा संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्यांकडून नक्षलवादी आणि शहरी भागातील त्यांचे सामाजिक कार्यकर्ते यांच्यातील पत्रव्यहाराचे अनेक कागदोपत्री पुरावे पोलिसांना मिळून आले आहेत. त्यातून एल्गार परिषदेनंतर अटक करण्यात आलेल्यांचे माओवाद्यांशी संबंध आले असल्याचा दावा करीत वकील उज्वला पवार यांनी शुक्रवारी त्यांचा जामीनाला विरोध केला.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रा. शोमा सेन, अॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. सुधा भारद्वाज, व्हर्णन गोन्सालवीस आणि अरुण फरेरा यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बचाव पक्षाचा युक्तिवाद पुर्ण झाला असून शुक्रवारी सरकारी पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात पुणे पोलीसांनी दाखल केलेले सर्व पुराव्यांची पाहणी करत, पुणे पोलिसांच्या बाजूने निर्णय देत एखाद्या गुन्हयाचा तपास करण्याचा अधिकार पोलिसांचा असल्याचे सांगितले. या गुन्हयाचा तपास प्रगती पथावर असताना, ठोस पुराव्यांचे आधारे पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) ची गरज नसल्याचे ही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, असून बंदी घालण्यात आलेली संघटना सीपीआय-माओवादी हिच्याशी त्यांचे संबंध असल्याचे निरीक्षणास आले आहे, असे अॅड. पवार यांनी सांगितले.
प्रस्थापित सरकार विरोधात हिंसक कटाची आखणी करून ते उलथवणे आणि देशाची सुरक्षा धोक्यात आणणे यादृष्टीने योजनेची आखणी करण्यात आली. सीपीआय-एम (माओवादी) संघटनेच्या सेंट्रल कमिटीचे सदस्य कॉ. गणपती, कॉ. किशनदा, कॉ. सुदर्शन, कॉ. मिलिंद ऊर्फ दिपक तेलतुबंडे यांच्यासोबत शहरी कार्यकर्त्यांचे झालेला पत्रव्यहाराबाबत माहिती अॅड. पवार यांनी दिली.
दिल्ली येथे रोना विल्सन याचे घरी छापा टाकला त्यावेळी त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आला. त्यामध्ये वरिष्ठ नक्षलवाद्यांशी झालेला अनेक पत्रव्यवहार उघड झाला आहे. कोरेगाव-भीमा येथील दंगलीनंतर याबाबत सीपीआय (एम) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या वरिष्ठ कमिटीने शहरी कॉम्रेडचे अभिनंदन केले असून यशस्वी आंदोलन झाल्याचे सांगितले. रोना विल्सनच्या लॅपटॉपमध्ये भूमिगत नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचा फोटो मिळून आला असल्याचे न्यायालयात युक्तीवादा दरम्यान अॅड. उज्ज्वला पवार यांनी सांगितले.