राहुल शिंदे - पुणे : राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येमराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे पुढील काळात मराठी विषयाच्या शिक्षकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यात इंग्रजी माध्यमाच्या १४ हजार २८१ शाळा आहेत. मात्र, या शाळांमध्ये कोणत्या इयत्तेपासून मराठी विषय सक्तीचा असेल, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे मराठीच्या नेमक्या किती हजार शिक्षकांना रोजगार उपलब्ध होईल, हे आताच सांगता येणार नाही.राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांमध्ये मराठी विषय शिकवलाच जात नाही, तर काही शाळांमध्ये मराठी विषयाला पर्यायी विषय देण्यात आला आहे. परंतु, महाराष्ट्रात राहूनसुद्धा अनेक विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे ज्ञान घेता येत नाही. त्यामुळेच राज्य शासनाने राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मराठी शिकविणे बंधनकारक केले. याबाबत कायदा केला जाणार असल्याने कोणत्याही शाळेला कायद्याचे उल्लंघन करता येणार नाही. परिणामी, शाळेमध्ये मराठी विषय शिकविण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल. राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यात इंग्रजी माध्यमाच्या एकूण १४ हजार २८१ शाळा आहेत. यातील राज्य मंडळाच्या (एससीसी बोर्ड) शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जातो. त्यामुळे सीबीएसईसह इतर सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठीच्या शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. त्यातच इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संस्थाचालक संघटनेच्या पदाधिकाºयांनी शासन निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, आपल्या शाळांमध्ये मराठी विषयाच्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवारांनाच शाळांमध्ये शिक्षक म्हणून अधिकृतपणे नोकरी दिली जाते. गेल्या पाच वर्षांत ६७ हजार ७०६ उमेदवार टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील केवळ ५ हजार ८०० उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. .........
निर्देशानुसार शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्तीशासनाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. राज्यात इंग्रजी माध्यमाच्या सुमारे २२ हजार शाळा असून, त्या शाळांमध्ये मराठी विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती करावी लागणार आहे. त्यामुळे मराठीच्या शिक्षकांना इंग्रजी शाळांमध्ये रोजगार उपलब्ध होईल. मात्र, कोणत्या इयत्तेपासून मराठी विषय सक्तीचा असेल, याबाबत शासनाने निर्देश दिलेले नाहीत. प्राप्त होणाºया निर्देशानुसार शाळांमध्ये शिक्षक नियुक्तीचे नियोजन केले जाईल.- राजेंद्र सिंग, कार्याध्यक्ष, इंडिपेन्डेंट इंग्लिश स्कूल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य............राज्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविला जातो. त्यामुळे एसएससी बोर्डाच्या शाळा सोडून इतर बोर्डांच्या शाळांमध्येच मराठी विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल. त्यामुळे पुढील काळात मराठीच्या शिक्षकांची काही प्रमाणात मागणी वाढेल.- संजय तायडे, अध्यक्ष, मेस्टा, महाराष्ट्र राज्य.
राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळांमध्ये मराठी विषयाचे शिक्षक नाहीत, अशा शाळांना येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठी विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल. त्यामुळे काही शिक्षकांना रोजगार मिळू शकेल - दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य.