एका दहशतीचा अंतच...

By admin | Published: August 13, 2014 12:46 AM2014-08-13T00:46:52+5:302014-08-13T00:46:52+5:30

संतापलेल्या जमावाने न्यायालयात पोलिसांच्या हातकडीतील कुख्यात भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव याचा खात्मा केला. त्याबरोबरच नागपूरच्या एका कोपऱ्यातील दहशतीचा कायमचा अंत झाला.

The end of a horror ... | एका दहशतीचा अंतच...

एका दहशतीचा अंतच...

Next

अक्कू यादवचा खात्मा : न्यायालयातील थराराला दहा वर्षे पूर्ण
राहुल अवसरे - नागपूर
संतापलेल्या जमावाने न्यायालयात पोलिसांच्या हातकडीतील कुख्यात भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव याचा खात्मा केला. त्याबरोबरच नागपूरच्या एका कोपऱ्यातील दहशतीचा कायमचा अंत झाला. संपूर्ण देशात बहुचर्चित ठरलेल्या या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.
१३ आॅगस्ट २००४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिल्हा न्यायालय आवारातील ऐतिहासिक दगडी इमारतीमध्ये चालणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालय क्रमांक ७ मध्ये ही थरारक घटना घटना घडली होती.
जरीपटक्यातील कस्तुरबानगर आणि परिसराला आपल्या गुन्हेगारी कृत्याने वेठीस धरणारा अक्कू १९९१ पासून गुन्हेगारीत सक्रिय झाला होता. सामूहिक बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणी वसुली, अशी २६ प्रकरणे त्याच्याविरुद्ध होती. १९९९ मध्ये त्याला झोपडपट्टी दादा व घातक व्यक्ती कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धही करण्यात आले होते. बलात्कार आणि छेडखानीची अनेक प्रकरणे त्याच्या दहशतीमुळे पोलिसांपर्यंत पोहोचतही नव्हती. तडीपार असतानाही कायदा मोडून तो गुन्हेगारीत सक्रिय होता.
७ आॅगस्ट २००४ ही त्याची अखेरची अटक ठरली. ८ आॅगस्ट रोजी त्याला न्यायालयात आणण्यात आले असता, त्याचाच एक साथीदार बिपीन बालाघाटी हा त्याला भेटण्यास आला होता. कपडे व टिफीनच्या आड तो अक्कूला चाकू देत असताना पकडल्या गेला होता. त्यानंतर अक्कूला १० आॅगस्ट रोजी न्यायालयात आणण्यात आले होते. त्याच दिवशी त्याच्या खात्म्याची योजना होती. परंतु ती तत्कालीन पोलीस उपायुक्त यशस्वी यादवमुळे फिसकटली होती.
१३ आॅगस्ट रोजी अक्कू आणि आणखी तीन आरोपींना हातकड्यांमध्ये हेड कॉन्स्टेबल दामोदर चौधरी यांच्यासह तीन पोलिसांनी न्यायालयात आणले होते. त्याच वेळी २५-३० पुरुष आणि १०-१२ महिलांचा संतप्त जत्था अक्कूच्या दिशेने सरसावला होता. अक्कू आणि साथीदारांना आत घेऊन पोलिसांनी दगडी इमारतीचे चॅनल गेट बंद केले होते. दरम्यान, अक्कूसह चौघांना न्यायालय क्रमांक ७ मध्ये नेण्यात आले होते.
येथील न्यायाधीश अवकाशावर असल्याने आरोपींना दुसऱ्या न्यायालयात नेण्याची तयारी सुरू असतानाच जमाव लाकडी दार तोडून न्यायालयात घुसला होता.
जमावाने आधी अक्कूच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली होती. त्यानंतर शस्त्राने वार करून व दगडाने ठेचून त्याचा जागीच मुडदा पाडला होता. त्याच्यावर शस्त्रांनी भोसकण्याचे ७३ घाव होते. सरकारविरोधी दहशतीचा कट जमावाने कायदा हातात घेऊन न्यायालयात पोलिसांच्या ताब्यातील आरोपीला ठार मारले होते. गुन्हेगारी कट करणे, गुन्हेगारी बल प्रयोगाद्वारे सरकारविरोधी दहशत माजवण्याचा कट करणे, बेकायदेशीर जमाव तयार करून खून करणे आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद करून सीआयडी पोलिसांनी एकनाथ चव्हाण, उषा नारायणे, अ‍ॅड. विलास भांडे, अजय मोहोड, सुमेद करवाडे, दिलीप शेंडे, पंकज भगत यांच्यासह २१ जणांना अटक केली होती. त्यात सात महिलांचा समावेश होता.
आरोपींपैकी सुमेद करवाडे, भागीरथा अडकिणे आणि अंजना बोरकर यांचे निधन झाले असून केवळ १८ आरोपीच आता कायम आहेत. आॅक्टोबर २०१२ पासून या खून खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ होऊन आतापर्यंत १३ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आलेल्या आहेत. पुढची सुनावणी १६ आॅगस्ट आहे.

Web Title: The end of a horror ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.