सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणावर भर
By admin | Published: March 2, 2015 02:32 AM2015-03-02T02:32:48+5:302015-03-02T02:32:48+5:30
पालिका सुरक्षा खात्यात दोन वर्षांच्या काळात अनेक बदल झाले असून, मागील वर्षी पार पडलेल्या भरतीत १ हजार जणांना काम
मुंबई : पालिका सुरक्षा खात्यात दोन वर्षांच्या काळात अनेक बदल झाले असून, मागील वर्षी पार पडलेल्या भरतीत १ हजार जणांना काम करण्याची संधी मिळाली आहे. खात्यातील साहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांची, ४०० सुरक्षारक्षकांची पदे रिक्त असून, ती लवकरच भरली जातील. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमरे, स्कॅनर मशिन, वाहनांना अडथळा ठरणारी यंत्रे विकत घेऊन सुरक्षा दलाचे आधुनिकीकरण करण्यात येईल, असे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त शांताराम शिंदे यांनी सांगितले.
महापालिका सुरक्षा दलाचा ४९वा वर्धापन दिन भांडुप संकुल येथील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात रविवारी पार पडला; त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात शांताराम शिंदे बोलत होते. प्रमुख सुरक्षा अधिकारी अरुण वीर म्हणाले, की १९६६ साली स्थापन झालेल्या पालिका सुरक्षा दलाची कार्यकक्षा वाढत चालली असून, या खात्यात १०० अधिकारी, ४ हजार जवान कार्यरत आहेत. मुंबई आणि नगरबाह्य विभागातील महापालिका मालमत्तांचे संरक्षण करण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत हे दल २४ तास कार्यरत राहत आहे. विभागात रिक्त असलेले सुरक्षा अधिकारी व सुरक्षारक्षकांची पदे भरण्यासाठी भरतीचा प्रस्ताव सादर करणार येणार आहे.
प्रारंभी पालिका सुरक्षा दलाने शिस्तबद्धरीत्या संचलन सादर करून मानवंदना दिली. त्यानंतर पंजाबी नृत्य, सामूहिक वंदे मातरम् तसेच कराटेची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शिवाय विविध क्रीडा प्रकारांत अंतिम विजेत्या ठरलेल्या संघांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कबड्डी स्पर्धेत मोहन पाडावे, व्हॉलीबॉल स्पर्धेत कर्णधार नितीन कांबळे, क्रिकेट स्पर्धेत मनोज काटुले यांचा उपायुक्त शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
या वर्षी उत्कृष्ट संचलनासाठीचा चषक शहर विभागाच्या पथक क्रमांक ९ने पटकावला असून, त्याचे नेतृत्व साहाय्यक सुरक्षा अधिकारी शेखर उदराज यांनी केले. याप्रसंगी या वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचा या वेळी पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रमुख सुरक्षा अधिकारी अरुण वीर, उप प्रमुख सुरक्षा अधिकारी विजय डाळींबकर, उप प्रमुख सुरक्षा अधिकारी श्रीनिवास कुळकर्णी, विभागीय सुरक्षा अधिकारी शिरीष काळे, विजय पराशर, साहाय्यक सुरक्षा अधिकारी तानाजी बांगर, रामचंद्र हराळे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)