शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के बसत असून मंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. दिलीप लांडे हे ३८ वे आमदार त्यांच्या गटात गेल्यानंतर मंत्री उदय सामंत हेही गुवाहाटीला रवाना झाले होते. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला असून बंडखोर आमदारांकडील खात्यांचा कारभार अन्य आमदरांकडे सोपवण्यात आला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आता उदय सामंत यांच्या खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे.
सध्या राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. दरम्यान, जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणेशक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.