इफेड्रीन : दोन अंगडिया चालकांची चौकशी
By admin | Published: July 27, 2016 08:18 PM2016-07-27T20:18:39+5:302016-07-27T20:18:39+5:30
अडीच हजार कोटींच्या बेकायदेशीर इफे ड्रीनच्या साठ्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने दोन अंगडिया चालकांचीही चौकशी सुरू केली आहे.
जितेंद्र कालेकर
ठाणे : अडीच हजार कोटींच्या बेकायदेशीर इफेड्रीनच्या साठ्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने दोन अंगडिया चालकांचीही चौकशी सुरू केली आहे. तसेच याप्रकरणी प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) नार्कोटिक्स अॅक्टच्या कलम २८ चाही समावेश केल्याची माहिती सूत्रांनी दिली. इफे ड्रीनची देशविदेशांत तस्करी केल्यानंतर त्या व्यवहाराच्या पैशांची बँकेत अधिकृत नोंद होऊ नये तसेच आयकर विभागाचीही नजर जाऊ नये, यासाठी एव्हॉन लाइफ सायन्सेसचा तत्कालीन संचालक मनोज जैन, सल्लागार पुनीत श्रींगी यांनी योग्य प्रकारे ‘खबरदारी’ घेतल्याचे तपासात उघड होत आहे. यातील सूत्रधार जयमुखी याने इफे ड्रीनची तस्करी करण्यासाठी किशोरसिंग राठोड आणि जैन यांच्यात मध्यस्थाची भूमिका केली. ड्रग तस्करीचे पैसे हवालामार्फत विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी यांना दिले गेले.
ते भुलेश्वर, मालाड आणि गुजरात येथून त्यांना पाठवल्याचेही काही दुवे पोलिसांच्या हाती लागले आहेत. याप्रकरणी दोन अंगडिया चालकांची पोलिसांनी मंगळवारी आणि बुधवारी चौकशी केली. या चौकशीत फारसे काही हाती लागले नाही. मात्र, त्यांच्या व्यवहारांची माहिती देण्याबाबत ठाणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याने कोणतीही माहिती आताच उघड करणे उचित होणार नसल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, अमली पदार्थ बनवण्याची पूर्वतयारी केल्याबाबतचे एनडीपीएस अॅक्टमधील कलम २८ चा समावेशही सुरुवातीच्या एफआयआरमध्ये केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.