सोलापूर : सोलापूर महापालिकेसह राज्यातील २७ महापौरांच्या आरक्षणाची सोडत बुधवारी मुंबईत काढण्यात येणार आहे. शहरातील राजकीय पक्षांचे राज्यातील सत्तास्थापनेसह आरक्षण सोडतीकडे लक्ष असणार आहे.
राज्यातील दहा महापौरांची मुदत १५ सप्टेंबर रोजी संपली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढ १५ डिसेंबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी आरक्षण सोडत निघणे अपेक्षित आहे. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दुपारी तीन वाजता आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
सोलापूर महापालिकेत १०२ सदस्य आहेत. भाजपकडे ४९, शिवसेना २१, काँग्रेस १४, एमआयएम ९, राष्ट्रवादी काँग्रेस ४, वंचित बहुजन आघाडी ३, माकप १ आणि बसपा १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडे बहुमत असल्याने महापौर भाजपचा होणार आहे. २००९ ते १२ या कालावधीत महापौरपद सर्वसाधारण गटाकडे होते. २०१२ पासून मात्र ओबीसी महिला, अनुसूचित महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी हे पद आरक्षित राहिले.
यंदा सर्वसाधारण प्रवर्ग किंवा अनुसूचित जाती प्रवर्गासाठीचे आरक्षण निघेल, अशी चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे. खुल्या प्रवर्गाचे आरक्षण निघाल्यास पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉ. किरण देशमुख दावेदार राहणार आहेत. विरोधी गटाकडून रस्सीखेच होऊ शकते. मात्र अनुसूचित जमातीची सोडत निघाल्यास भाजपचे एकमेव सदस्य राजेश काळे यांच्याकडेच पद जाणार आहे.
आरक्षणाचा कालावधी आरक्षण महापौर
१९९९ ते २००२ अनुसूचित जाती संजय हेमगड्डी
२००२ ते ०५ महिला नलिनी चंदेले
२००५ ते २००७ ओबीसी विठ्ठल जाधव
२००७ ते २००९ महिला अरुणा वाकसे
२००९ ते १२ सर्वसाधारण आरिफ शेख
२०१२ ते १४ ओबीसी महिला अलका राठोड
२०१४ ते १७ अनुसूचित जाती महिला सुशीला आबुटे
२०१७ ते १९ महिला शोभा बनशेट्टी