रायगड-
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर खार पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचं शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी समर्थन केलं आहे. सोमय्या काय त्या कारमध्ये जर मोदी जरी असते तरी शिवसैनिकांनी कार फोडली असती असं विधान दिपाली सय्यद यांनी यावेळी केलं. त्या खोपोली येथे एका कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या.
"जेव्हा ही घटना घडली त्या परिस्थितीवेळी प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर होता आणि हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांची शिकवण आहे जो नडला त्याला फोडला. जर तिथं त्या कारमध्ये जर मोदीही असले असते ना तर त्या कारला तसंच फोडलं असतं. तुम्ही तिथं जाणार या सगळ्या गोष्टी घडणार पण तुम्ही हे केलंच कशाला?", असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
खासदार नवनीत राणा यांनी पोलीस कोठडीत हीन वागणूक दिली जात असल्याच्या आरोपावरही दिपाली सय्यद यांनी भाष्य केलं. "न्यायालयीन कोठडीमध्ये तुम्हाला काय फाइव्ह स्टोर हॉटेलची ट्रीटमेंट मिळत नाही हे त्यांनी आधी समजून घ्यायला पाहिजे. तुमच्यावर गुन्हा दाखल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजद्रोही गुन्हा दाखल आहे. तुम्हाला तिथं नेलं आहे आणि तुम्ही म्हणत असाल मला फाइव्ह स्टारची थाळी आणून द्या. मला गुलाबजाम खायला घाला, तर तसं होत नाही. जी बाकीच्या लोकांना केली जाते तिच शिक्षा तुम्हालाही केली गेलीय", असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
राणा दाम्पत्याला दिलासा नाहीचखासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज जामीनासाठी सत्र न्यायालयाचा दार ठोठावलं. पण सत्र न्यायालयानंही सरकारी वकिलांना याप्रकरणी तीन दिवसांची वेळ देत जामीनावरील सुनावणी २९ एप्रिल रोजी केली जाईल असं म्हटलं. त्यामुळे राणा दाम्पत्याला २९ एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. न्यायालयानं राणा दाम्पत्याच्या जामिनाच्या याचिकेवर २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानंतरच सुनावणीची तारीख ठरवू असं सत्र न्यायालयानं म्हटलं. त्यामुळे आता २९ एप्रिल रोजी नियोजित असलेल्या सुनावणीवेळीच जामिनाच्या प्रश्नावर सुनावणी होईल हे आता निश्चित झालं आहे.
मुंबई पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत राणा दाम्पत्याला अटक केली आहे. अटकेसाठी गेलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घातली, त्यांना धक्काबुक्की केल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात कलम ३५३ गुन्हा दाखल करण्यात आला. याची नोंद वेगळ्या एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.