पेपर तपासणीवर बहिष्कार
By admin | Published: March 2, 2015 02:19 AM2015-03-02T02:19:01+5:302015-03-02T02:19:01+5:30
मूल्यांकनानुसार अनुदानास पात्र विनाअनुदानित शाळांची त्रयस्थ समितीमार्फत झालेली फेरतपासणी रद्द करण्याचे आश्वासन शालेय
मुंबई : मूल्यांकनानुसार अनुदानास पात्र विनाअनुदानित शाळांची त्रयस्थ समितीमार्फत झालेली फेरतपासणी रद्द करण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले होते. याबाबत शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा समितीने शिक्षणमंत्र्यांना पत्राद्वारे दिला आहे.
विनाअनुदानित शाळांची शिक्षण विभागाने यापूर्वी अनेक समित्यांमार्फत तपासणी करून शाळांना अनुदानास पात्र ठरविले. यानंतर त्रयस्थ समितीकडून शाळांची तपासणी केली असून, ती चुकीच्या पद्धतीने झाली आहे. त्यामुळे अनुदानास पात्र अनेक शाळा चुकीची कारणे दाखवून अपात्र ठरवल्या आहेत. यासाठी कृती समितीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्रयस्थ समिती रद्द करून पात्र झालेल्या शाळांना अनुदान देण्याची मागणी केली होती.
शिक्षण विभागाकडून वेळकाढूपणाचे धोरण राबवत असल्याने शाळा कृती समितीने शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. याबाबत दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास ९ मार्चपासून आझाद मैदानात आंदोलनाचा आणि त्यानंतर दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीने दिला आहे. दरम्यान, समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ३ मार्च रोजी होणार असून, यात आंदोलनाबाबत निर्णय होणार आहे. या आंदोलनामुळे दहावीच्या परीक्षांवर परिणाम होणार नसून, विद्यार्थ्यांनी चिंता न करता परीक्षा द्यावी. परीक्षेनंतर शासनाने मागण्या मान्य केल्यास दिवस-रात्र पेपर तपासू, असे मुंबई जिल्हा महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा समितीचे अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)