लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सारखे भांडण करणा-या नवविवाहित पत्नीचा तिच्या वाढदिवशीच काटा काढण्याचा कट एका नवरोबाने रचला. त्यानुसार, तिच्यावर बर्थ डे केकमधून विषप्रयोग करून त्याने तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांझरा लेआऊट, एकतानगर परिसरात ही घटना घडली. यामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. आलिया जमील खान (वय २५) असे पीडित पत्नीचे नाव असून, तिच्यावर विषप्रयोग करणा-या आरोपी पतीचे नाव जमील खान (वय ३५, रा. फारूखनगर, टेका नाका) असे आहे.
टेका नाका परिसरात जमीलचा कपडे तयार करण्याचा कारखाना आहे. तो विवाहीत आहे. त्याच्या कारखान्यात इतर महिलांसोबत आलिया कामाला येत होती. त्यातून ओळखी झाल्यानंतर जमील आणि आलिया या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर तो विवाहित असल्याचे माहित असूनही घरच्यांच्या संमतीने आलियाने जमीलसोबत मार्च २०१७ मध्ये विवाह केला. विवाहानंतर काही दिवसातच त्यांच्यात कुरबूर वाढली. दोघेही एकमेकांसोबत भांडू लागले. काही दिवसांपूर्वी आलिया तिच्या आईच्या घरी एकतानगर, वांझरा लेआऊटमध्ये आली होती.
आलिया शिघ्रकोपी आणि भांडणखोर असल्याचे लक्षात आल्याने जमील तिला स्वत:पासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, लग्नाला चारच महिने झाल्यामुळे ते शक्य नव्हते. त्यामुळे तिला कायमचे दूर करण्याचा कट आरोपी जमीलने रचला. त्यानुसार, २२ जुलैला आलियाचा वाढदिवस असल्याची संधी साधून रात्री ११.४५ वाजता जमीलने तिचा बर्थ डे साजरा करण्याच्या बहाण्याने तिच्या आईच्या घरी केक नेला. २२ जुलैला प्रारंभ होताच जमीलने आलियाच्या हाताने बर्थ डे केक कापून घेतला. तो तिला खाऊ घातला आणि तेथून निघून गेला. काही वेळेनंतर आलियाला मळमळ, ओका-या होऊ लागल्या.
डॉक्टरांनी केला खुलासा
तिची प्रकृती ढासळू लागल्याने तिची आई सायरा बानो अहमद खान (वय ४०) यांनी जावई जमीलला फोन करून बोलवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सायरा बानो यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून घरी बोलवून घेतले. त्यांच्या मदतीने आलियाला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. आलियाच्या पोटात विष असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी तिच्या आईला रात्री काय खाल्ले, त्याबाबत विचारणा केली. सायरा बानो यांनी बर्थ डे केकची माहिती सांगितल्यानंतर डॉक्टरांनी त्यातूनच विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आलियाचे सारेच नातेवाईक चक्रावले. आरोपी जमीलने जो केक आणला होता त्यात त्याने विष घातले होते, हे स्पष्ट झाल्यामुळे आलियाच्या आईने यशोधरानगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार नोदवली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक बी. ए. हूड यांनी आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला. त्याचा शोध घेतला जात आहे.