प्रेमदास राठोड ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना यंदा २०२० वर्षात अतिरिक्त २२ सुट्ट्या मिळाल्या आहेत. हे सर्व २२ दिवस दुसरा व चौथा वगळून इतर शनिवार आहेत. यंदा शनिवार-रविवार एकूण १०० साप्ताहिक सुट्ट्या आणि १६ सार्वजनिक रजा अशा एकूण ११६ सुट्ट्या कर्मचाऱ्यांना मिळतील आणि २५० दिवस सरकारी कार्यालये सुरू राहतील.
बकरी ईद (१ ऑगस्ट), स्वातंत्र दिन (१५ऑगस्ट), गणेश चतुर्थी (२२ऑगस्ट), लक्ष्मीपूजन (१४ नोव्हेंबर) या ४ सार्वजनिक सुट्ट्या शनिवारी येत आहेत.पुढील आठवड्यात २० तारखेला एक दिवसाची रजा तर घेतली तर कर्मचाºयांना लागोपाठ ५ दिवसाची सुट्टी मिळणार आहे. १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराज जयंती तर २१ फेब्रुवारीला महाशिवरात्री या २ सार्वजनिक सुट्ट्या असून नंतर दुसरा शनिवार आणि रविवार आहे. ५ दिवसाचा आठवडा सुरू होण्यापूर्वी या सुट्ट्या येत आहेत.
७-८ मार्चला शनिवार, रविवार आहे. ९ मार्च कामाचा दिवस असून लगेच दुसºया दिवशी १० मार्चला होळीची सुटी आहे.एप्रिलमध्ये रामनवमी व महावीर जयंती दरम्यान शनिवार व रविवार येत आहे. एका शुक्रवारची रजा टाकली तर २ ते ६ एप्रिल अशी ५ दिवसांची सुटी मिळू शकते. लगेच ४ दिवसानंतर गुड फ्रायडे आणि आंबेडकर जयंती या दोन सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये शनिवार-रविवार येत आहे, १३ एप्रिलची रजा टाकली तर कर्मचाºयांना लागोपाठ ५ दिवसाची (१० ते १४ एप्रिल) रजा मिळणार आहे. मेमध्ये १ मे ला लागून ३ सुट्ट्या आहेत, नंतर ७ मे रोजी बुद्ध पौर्णिमा आणि एक दिवसाची रजा काढली तर ९-१० मे शनिवार-रविवार आहेत. पुन्हा रमजान ईदला लागून २३ व २४ मे रोजी शनिवार-रविवार येत आहेत.
ऑक्टोबरमध्ये ३ दिवसांच्या सुट्ट्या दोनदा येत आहेत. पहिली सुटी महात्मा गांधी जयंतीला लागून तर दुसरी ३० ऑक्टोबरच्या ईद-ए-मिलादला लागून येत आहेत.नोव्हेंबरमध्ये गुरुनानक देव जयंतीला लागून ३ दिवस आणि डिसेंबरमध्ये नाताळाला लागून शनिवार व रविवार येत आहेत.पाच दिवसांचा आठवडा केला नसता तर सर्व रविवार, दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्ट्या अशा एकूण ९४ सुट्ट्या यंदा कर्मचाºयांना मिळाल्या असत्या आणि ३६६ पैकी २७२ दिवस सरकारी कार्यालये सुरु राहिली असती.