फडणवीस-ठाकरे वादामुळे राज्यातील सत्तेचे चित्र बदलले - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 02:46 AM2019-12-31T02:46:49+5:302019-12-31T02:47:12+5:30
मुख्यमंत्रीपद वाटपाचा प्रस्ताव अमित शहांनी नाकारला
कोल्हापूर : राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट जनादेश असतानासुद्धा देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे यांच्यातील वादामुळे सत्तेचे चित्र बदलले, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
आठवले म्हणाले, की ठाकरे व फडणवीस या दोघांतील वाद फारच ताणल्यामुळे आपले सरकार येणार नाही याची मला जाणीव झाल्यानंतर मी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटलो. भाजपने तीन वर्षे मुख्यमंत्रिपद घ्यावे तर उर्वरित दोन वर्षे शिवसेनेला द्यावे, असा पर्याय मी त्यांना दिला. परंतु, फडणवीस यांनी अजित पवार व त्यांचे अनेक आमदार आपणाला पाठिंबा देणार असल्याचे शहा यांना अगोदरच सांगून ठेवले होते. त्यामुळे शहा यांनी माझा प्रस्ताव मानला नाही.
मी आशावादी आहे. शिवसेनेला पुन्हा परत आणण्याचा माझा प्रयत्न आहे. तीन पक्षांचे सरकार आता सत्तेत आल्यामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण होणार आहेत आणि त्यातूनच सरकार पडेल, असेही आठवले म्हणाले.