दापोली (जि. रत्नागिरी) : तालुक्यातील भडवळे येथील एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी १३ ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडवळे येथील ग्रामस्थ दत्ताराम रामचंद्र लोंढे (सध्या रा. विरार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोंढे यांच्या वडिलांच्या नावे लालबाग-मुंबई येथील चाळीत खोली होती. या खोलीत वडिलांनी सांगितल्यास भडवळे येथून येणाºया गरजू लोकांना राहण्यासाठी जागा दिली जात असे. या खोलीत दत्ताराम लोंढे हेही राहत होते. १९८३मध्ये लोंढे यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर दत्ताराम लोंढे यांनी ही खोली आपल्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, ही खोली वाडीतील ग्रामस्थांची असून, लोंढे यांच्या वडिलांनी ती आपल्या नावावर करून घेतली, असे म्हणणे वाडीतील ग्रामस्थांनी मांडले. दरम्यान, ही चाळ जीर्ण झाल्यानंतर म्हाडाने चाळीचा पुनर्विकास केला. त्यानंतर ही खोली वडिलांच्या नावे झाली.या खोलीच्या मालकीबाबत चर्चा करण्यासाठी ३ डिसेंबर २०१७ रोजी भडवळे उसवाडी येथील अशोक रेवाळे यांच्या घरी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत दत्ताराम लोंढे यांचा भाऊ जनार्दन, भावजय जोत्स्ना हजर होते. या वेळी ग्रामस्थांनी लोंढे यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या खोलीबाबत विचारणा केली. त्या वेळी जनार्दन लोंढे यांनी या विषयाकरिता माझ्या भावाला बोलावणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्याचा राग मनात धरून बैठकीला असलेल्या १३ ग्रामस्थांनी जनार्दन लोंढे यांच्या कुटुंबीयाशी संबंध तोडून त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला. या १३ संशयितांवर महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारपासून व्यक्तीचे संरक्षण या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुटुंबावर बहिष्कार; १३ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:24 AM