जळगावच्या शेतकऱ्याला विमानतळावर अटक
By admin | Published: June 11, 2015 01:42 AM2015-06-11T01:42:20+5:302015-06-11T01:42:20+5:30
देशांतर्गत विमानतळाची सुरक्षा भेदून आत शिरलेल्या चाळीस वर्षीय शेतकऱ्याला ताब्यात घेऊन शनिवारी रात्री त्याच्यावर एअरपोर्ट पोलीस ठाण्यात
मुंबई : देशांतर्गत विमानतळाची सुरक्षा भेदून आत शिरलेल्या चाळीस वर्षीय शेतकऱ्याला ताब्यात घेऊन शनिवारी रात्री त्याच्यावर एअरपोर्ट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची अधिक चौकशी सुरू आहे.
राजू राठोड असे अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तो मूळचा जळगावचा रहिवासी आहे. १५ दिवसांपूर्वी पत्नीशी झालेल्या भांडणानंतर त्याने घर सोडले आणि मुंबई गाठली. या ठिकाणी लहान-मोठे काम करून तो उदरनिर्वाह करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. फेरफटका मारीत असताना तो वाकोल्यात पोहोचला आणि त्याने गावदेवी परिसरातील विमानतळाची सुरक्षा भिंत भेदून विमानतळात प्रवेश केला आणि निषिद्ध क्षेत्रामधून तो चालत होता. त्या वेळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी रोहन मुराडकर यांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानांची मदत घेत त्यांनी राठोडला पोलिसांच्या स्वाधीन केले. राठोडची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्याचे एअरपोर्ट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र नागभिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राठोडचा घातपाताचा काही उद्देश नसून, या ठिकाणी प्रवेश निषिद्ध
असल्याचे माहीत नसल्याने त्याने विमानतळ परिसरात प्रवेश केल्याचे उघड झाल्याचेही नागभिरे यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)