गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यावर चहुबाजूंनी संकट उभी राहत आहेत. अन्नदाता बळीराजा या संकटांच्या आव्हानांना तोंड देत वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून जनतेची भूक भागवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र, अशातच व्यापारी शेतकऱ्यांशी करत असलेल्या थट्टेलाही लाज वाटेल, अशी एक घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
पुण्यातील शेतकरी खरीब आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांमध्ये शेती करतात. प्रत्येक ऋतुप्रमाणे शेतीत प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पुणे जिल्ह्यात मोठी आहे. तरकारी पिके काढण्याकडे त्याचा जास्त कल असतो. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील एक घटना समोर आली आहे. येथील शेतकऱ्याने दोन एकरमध्ये फ्लॉवरचे पीक घेतले. मात्र, हा फ्लॉवर तोडून जेव्हा मार्केटला व्यापाऱ्याकडे पाठवला तेव्हा त्याला या मालाची अवघी साडेनऊ रुपयांची पट्टी आली म्हणजे पैसे मिळाले. त्यामुळे शेती करायची की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकल्याचे बोलले जात आहे.
पीक घेण्यासाठी सर्व खर्च एकूण १३०० रुपये
शेतकऱ्याने उसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून फ्लॉवर हे पीक दोन एकरमध्ये घेतले होते. त्यात फ्लॉवरच्या सतरा पिशव्या त्यांनी मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी पाठवल्या होत्या. हे पीक घेण्यासाठी सर्व खर्च एकूण १३०० रुपये इतका आला असून त्याची विक्रीतून रक्कम फक्त साडेनऊ रुपयेच मिळाले. त्यामुळे शेतकऱ्याला हसावे की रडावे अशी त्याची परिस्थिती झाली आहे. आम्हाला मिळालेले ते साडेनऊ रुपये पुन्हा चेकद्वारे व्यापाऱ्याला पाठवणार असल्याचे संबंधित शेतकऱ्याने म्हटले आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी तरकरी उत्पादक शेतकरी म्हणून ओळखला जातो. या भागात मोठया संख्येने तरकरी पिके घेतली जातात. यावरच शेतकऱ्याचा उदरनिर्वाह असतो.यात शेतकरी शिरूर या भागात मिरची, भेंडी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबी आदी पिके शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. सर्व खर्च वजा जाता केवळ साडे नऊ रुपये आल्याने शेतकऱ्याची आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.