शेतकरी दुबार पेरणीच्या चक्रव्यूहात!

By admin | Published: August 13, 2014 12:54 AM2014-08-13T00:54:06+5:302014-08-13T00:54:06+5:30

अगोदरच दीड महिना उशिरा आलेला पाऊस शेतकऱ्याशी अक्षरश: लपंडाव खेळत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे.

Farmers in the cyclone sowing! | शेतकरी दुबार पेरणीच्या चक्रव्यूहात!

शेतकरी दुबार पेरणीच्या चक्रव्यूहात!

Next

पावसाने पुन्हा दडी मारली : कृषी विभागाकडे शेकडो तक्रारी
नागपूर : अगोदरच दीड महिना उशिरा आलेला पाऊस शेतकऱ्याशी अक्षरश: लपंडाव खेळत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. यापूर्वीच पावसाच्या खंडामुळे अनेकांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे अगोदरच त्याला आर्थिक फटका बसला आहे. अजूनपर्यंत कृषी विभागाकडे दुबार व तिबार पेरणीची अधिकृत आकडेवारी प्राप्त झालेली नसली, तरी संपूर्ण विभागात साधारण २५ ते ३० टक्के दुबार पेरणी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच १० ते १५ टक्क्यांपर्यंत तिबार पेरणी झाली आहे. यासंबंधी विभागीय कृषी उपसंचालक अजय राऊत यांना विचारणा केली असता, त्यांनी सर्व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांकडून आकडेवारी मागविली असून, अजूनपर्यंत ती प्राप्त झाली नसल्याचे ते म्हणाले.
विदर्भात दरवर्षी साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडतो. मात्र यंदा तो जुलै महिन्याच्या शेवटी आला. त्यामुळे पेरणीला तब्बल दीड महिना विलंब झाला. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसावर सोयाबीन व कापसाची पेरणी आटोपली. परंतु दोनच दिवसांत पुन्हा पाऊस गायब झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बियाणे जमिनीत पचले. १५ दिवसांच्या उसंतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शेतकरी पुन्हा उत्साहित झाला. तडजोड करून, पुन्हा बी-बियाणे व खतांची खरेदी करून, दुबार पेरणी केली. यावेळी साधारण आठवडाभर पाऊस सुरू राहिला. त्यामुळे पिकांची उगवण सुरू झाली. शेतकरीही आनंदीत झाला. परंतु त्याचा हा आनंद काहीच दिवस टिकला. ऐन शेत अंकुरत असताना पाऊस पुन्हा गायब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे माळरान हिरवे होण्यापूर्वीच पुन्हा काळे झाले. यामुळे शेतकरी चांगलाच खचला. काहींनी हिंमत करून, तिसऱ्यांदा पेरणी केली. परंतु अनेकांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांची शेती पडित राहिली. आता गत १५ दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. शेतातील हिरवेगार पीक कोमेजू लागले आहे.
कृषी अधिकाऱ्यांच्या मते, यंदा पेरणीला साधारण दीड महिन्यांचा विलंब झाला आहे. याचा थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे. सोयाबीनचे पीक पेरणीपासून साधारण १०० ते १०५ दिवसांत कापणीला येते. त्यानुसार जून महिन्यात पेरणी झालेले पीक सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या हाती येते. मात्र यंदा पेरणीच १५ जुलैपासून सुरू झाली आहे. त्यामुळे कापणीचा कालावधी लांबणार आहे. दुसरीकडे त्या पिकाला हवामानातील बदलाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers in the cyclone sowing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.