नितीन काळेलसातारा : काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या रेशीम उद्योगाला सातारा जिल्ह्यात चांगले दिवस येत असून, शेकडो शेतकरी याकडे आता वळू लागले आहे. अवघ्या एक एकर क्षेत्रामधून लाखो रुपयांचे उत्पन्न व शासनाकडून स्वत:च्या शेतात राबून रोजगाराच्या रुपातून पैसे मिळत असल्याने शेतकºयांच्या जीवनात ख-या अर्थाने अर्थक्रांती होऊ लागली आहे. त्यामुळेच आज जिल्ह्यात ७०० एकरांवर तुतीची लागवड गेली आहे. दुष्काळी माण, फलटण तालुक्यांतही वाढ झाली आहे.
सातारा जिल्ह्यात अलीकडील काळात तुतीची लागवड वाढली आहे. कारण, जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, वातावरण, शेतक-यांचे जीवनमान आदी बाबी या रेशीम उद्योगासाठी पोषक ठरू लागल्या आहेत. त्यातच वाई येथे असणारे जिल्हा रेशीम कार्यालय त्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू लागले आहे. या कार्यालयांतर्गत रेशीम विस्तार, रिलींग फार्म व विस्तार विकासाचे कामकाज होते. त्यामुळेच रेशीम उद्योगाला चढती कमान प्राप्त आहे. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम संचालनालयाने नवीन तुती लागवडीसाठी अभियान राबविले. त्याला शेतक-यांचा मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळेच जिल्ह्यात चालूवर्षी ४५० एकर क्षेत्रावर नवीन तुती लागवड होत आहे.
सध्या जुनी तुती लागवड क्षेत्र सातारा आणि क-हाड तालुक्यांत सर्वाधिक आहे. या तालुक्यातील शेतकरी चांगल्या प्रकारे रेशीम उद्योग करून उत्पादन घेत आहेत. सध्या जिल्ह्यात जुनी तुती लागवड असणारी शेतकरी संख्या ३०५ असून त्यांनी ३१४ एकरांवर लागवड केली आहे. तर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये ४१५ शेतक-यांनी ३९६ एकरांवर नवीन तुती लागवड केली असून, ‘मनरेगा’ व्यतिरिक्त २८ शेतकºयांनी २८.५० असे एकूण ४४३ शेतकºयांनी ४२४.५० एकरांवर लागवड केली आहे. त्यातच रोजगार हमी योजनेंतर्गत शेतक-यांना दर आठवड्याला मजुरी अनुदान रक्कमही मिळत आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात तुती लागवड अधिक होताना दिसत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेंगतर्गत सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात तुती लागवडीत प्रथम क्रमांकावर आहे.
सध्या जिल्ह्यात जुनी तुती लागवड ३१४ एकरांवर असून, ३०५ शेतकरी सहभागी आहेत. नवीन तुती लागवडीत ४४३ शेतकºयांचा समावेश असून ४२४ एकरांवर लागवड आहे तर एकूण ७४८ शेतक-यांची ७३८ एकर क्षेत्रावर लागवड आहे. पूर्वी काही भागातच ही लागवड अधिक होत होती.आता मात्र, तसे राहिलेले नाही. माण, फलटणसारख्या दुष्काळी भागातही तुतीची लागवड वाढलेली आहे.
माणमध्ये नवीन तुती लागवड केलेले शेतकरी संख्या ७५ असून, सातारा आणि कोरेगाव तालुक्यानंतर माणचा तिसरा क्रमांक लागत आहे. २०१८-१९ साठीही माणमधील सर्वाधिक म्हणजे १७६ शेतकरी असून माध्यमातून तुतीची लागवड होत आहे. फलटण तालुक्यातही तुती लागवड करणाºयांची संख्या वाढत आहे.राज्य शासनाने तुती लागवडीच्या कामाचा समावेश ‘मनरेगा’त केला आहे. गट शेती कार्यक्रमांतर्गत एका शेतकºयाला एका एकरावरच तुतीची लागवड करता येणार असून, तीन वर्षांत ६८२ दिवसांची मजुरी मिळत आहे. त्यामुळे रेशीम उत्पादकांना स्वत:च्याच शेतात मजुरी मिळत असल्याने हाही फायदा होत आहे.