मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी आणि 10 रुपयात जेवण ह्या योजनांची घोषणा केली. मात्र या दोन्ही योजना अटी-शर्तीच्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर आता याच मुद्यावरून भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी सुद्धा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. मात्र 2 लाखांच्या वरती कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. तर त्याचप्रमाणे राज्यात प्रत्येक जिल्ह्यात 10 रुपयात जेवण देण्याची योजनेची सुद्धा सरकारने घोषणा केली आहे. पण त्यासाठी सुद्धा अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहे.
तर सरकारच्या या दोन्ही योजना फसव्या असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. 'बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे, तितकीच त्यांची शिवभोजन योजना सुद्धा फसवी असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.
भुकेल्याला अन्न देताना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरू केलीय. 10 रुपयात जेवणाची थाली देण्याची घोषणा केली मात्र तेथेही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. गरीबाला जेवू घालताय की त्यांची थट्टा करताय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर बिनशर्त सर्वाना जेवण मिळालेच पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळी कदम यांनी केली.