शेतकऱ्यांना कळणार मित्र अन् शत्रू!

By admin | Published: May 22, 2015 01:30 AM2015-05-22T01:30:17+5:302015-05-22T01:30:17+5:30

शेतकऱ्याचा मित्र की शत्रू, शत्रू असेल तर जैवविविधता कायम ठेवून त्याला कसे संपवायचे अशी सर्व माहिती संकलित करण्यात आल्याचे या केंद्राचे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Farmers will know friends and enemies! | शेतकऱ्यांना कळणार मित्र अन् शत्रू!

शेतकऱ्यांना कळणार मित्र अन् शत्रू!

Next

गजानन दिवाण - औरंगाबाद
एखाद्या पिकावर अळी दिसली, तर ती मित्र की शत्रू हे शेतकऱ्यांना कसे समजणार? गावच्या पुढारलेल्या शेतकऱ्याने फवारणी केली म्हणून अख्ख्या गावाने तीच करायची. जैवविविधतेला अत्यंत धोकादायक असलेली ही पद्धत वापरण्याची गरज आता भासणार नाही. पिकावर दिसलेल्या अळी-कीटकाचा फोटो काढायचा आणि काही क्षणात त्याची संपूर्ण माहिती मिळवायची... त्यावर उपाय काय करायचा, हेही समजून घ्यायचे... औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हर्बर्ट डीएनए बारकोडिंग व जैवविविधता अभ्यास केंद्रातर्फे या महत्त्वपूर्ण प्रकल्पावर काम केले जात आहे.
फवारणीच्या या पारंपरिक पद्धतीमुळे अनेक जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे टाळण्यासाठी पॉल हर्बर्ट केंद्राने राज्यातील विविध ठिकाणचे सात हजार कीटकांचे नमुने जमा केले. त्याचे डीएनए बारकोडिंग केले. हा कीटक कोठे आढळतो? तो शेतकऱ्याचा मित्र की शत्रू, शत्रू असेल तर जैवविविधता कायम ठेवून त्याला कसे संपवायचे अशी सर्व माहिती संकलित करण्यात आल्याचे या केंद्राचे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कीटकांचे हे नमुने जमा करण्यासाठी साजिद खान, चंद्रकांत जाधव यांच्यासह राज्यभरात १५ ते २० समूहांनी काम केले. त्यांचे फोटो गोळा केले. ही सर्व माहिती आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आली. जगभरातील तज्ज्ञांनी त्या-त्या ठिकाणचे स्थानिक संदर्भ दिले. काही ठिकाणी भरही घातली. असा तावून सुलाखून निघालेला सात हजार कीटकांचा हा डेटा शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी असल्याचे खेडकर म्हणाले. आता अधिक तर शेतकरी टेक्नोसेव्ही झाले आहेत. त्यांनी आपल्या पिकांवरील अळी, कीटकांचा फोटो काढून पाठविल्यास त्याची संपूर्ण माहिती काही क्षणात त्यांना मिळू शकते.
या डेटा एकत्रीकरणाचे काम पूर्ण झाले असून, हा प्रस्ताव घेऊन आम्ही राज्य सरकारकडे जाणार आहोत. तशी बोलणी सुरू झाल्याचे खेडकर यांनी सांगितले.
२०१० मध्ये सुरू झालेले हे केंद्र डीएनएद्वारे जीवांची ओळख करण्यात भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. जगभरातील १७७ देशांच्या समन्वयाने हे काम सुरू आहे. विविध राज्यांतील जवळपास ३२ विद्यार्थी येथे वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करीत आहेत. कीटकांप्रमाणेच राज्यातील गांडुळांचे डीएनए बारकोडिंगही पूर्ण करण्यात आले आहे. राज्यातील विविध ठिकाणांहून यासाठी तब्बल ३ हजार ९६१ नमुने जमा करण्यात आले. कोणत्या पिकातून हा गांडूळ घेण्यात आला. त्याचे ठिकाण काय, ही सर्व माहिती जमा करण्यात आली.

जागतिक
जैवविविधता
दिन विशेष
याशिवाय माशांच्या प्रजातींचा डेटा तयार केला आहे. नर्मदा, गोदावरी, दामोदर या नद्यांचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून, कृष्णा ८० टक्के, महानदी ७० टक्के, तर गंगा नदीचे काम ६० टक्के पूर्ण झाले.

नद्या जोड प्रकल्पाचा आत्मघातकी निर्णय : ‘डीएनए’ बारकोडिंग या तंत्राद्वारे केलेल्या जगन्मान्य संशोधनानुसार गोदावरी, नर्मदा, महानदी, कृष्णा आणि गंगा या नद्यांमधील माशांची जैवविविधता अद्वितीय आहे. त्यांच्यामध्ये २३ टक्क्यांपर्यंतच साम्यता असून, ७७ टक्के निराळेपण आहे.

सात हजार औषधी वनस्पतींचे कलेक्शन : डॉ. गुलाब खेडकर आणि वसंतराव नाईक महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विक्रम खिलारे यांनी हिमालयापासून ते आपल्या परसदारात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींपर्यंत तब्बल सात हजार नमुने जमा करून त्यांनी जिन बँक तयार केली.

Web Title: Farmers will know friends and enemies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.