घाबरू नका, शासन यंत्रणा सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 04:38 AM2020-03-06T04:38:38+5:302020-03-06T04:38:52+5:30
पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुुरुवारी विधानसभेत सांगितले.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी भयभीत होवू नये. असे आश्वस्त करतानाच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, होळी साजरी करताना तिचे स्वरुप मर्यादित ठेवा. मुंबई पाठोपाठ पुणे, नागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.
कोरोनाच्या संकटावर विधानसभेत सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभू, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील,रवि राणा, प्रताप सरनाईक, आशीष शेलार, नितेश राणे आदींचा समावेश होता. कोरोनाबाबत भीती दूर करण्यासाठी राज्यशासनाने पावले उचलावीत. जनजागृती मोहिम हाती घ्यावी, असे निर्देश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाबाबात नमुने तपासण्याची सुविधा पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत केली आहे. मुंबई आणि नागपूर येथेही याची सोय करण्यात आली आहे. राज्यात आवश्यक त्या मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मुंबईत रिकामे पडलेल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा उपयोग करण्याचा विचार आहे. आंतरराष्ट्रीय विमाने येतात तेथे तपासणीची सोय करण्यात आली आहे.
>काळजी घ्या...
महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये तर काळजी घ्यावी. भीती न बाळगता सतर्क राहा. सामान्यांनी मास्क लावून फिरण्याची गरज नाही, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नंतर पत्रपरिषदेत केले.