राज्य कर्मचा-यांचा फेब्रुवारीत महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 03:01 AM2018-01-15T03:01:04+5:302018-01-15T03:01:14+5:30
राज्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला मंत्रालयावर महामोर्चा काढून राज्य शासनाचे लक्ष वेधून घेणार आहेत
ठाणे : राज्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला मंत्रालयावर महामोर्चा काढून राज्य शासनाचे लक्ष वेधून घेणार आहेत. दीर्घकाळापासून वंचित असलेल्या या कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकारी महासंघदेखील यात सहभागी होण्याच्या प्रयत्नात आहे. शासनाने गांभीर्याने न घेतल्यास ऐन मार्च महिन्यात बेमुदत संपाची हाक दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
या महामोर्चासाठी नुकताच नाशिक येथे कर्मचाºयांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष भास्कर गव्हाळे यांनी सांगितले. राज्यभरातील लाखो कर्मचारी या महामोर्चाद्वारे मंत्रालयावर धडकणार आहेत. यासाठी राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आदींच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील कर्मचारी यात सहभागी होणार आहेत.