ओला कॅबमध्येच झाली महिलेची प्रसुती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 03:52 PM2017-10-05T15:52:09+5:302017-10-05T17:10:47+5:30
प्रसुती वेदना सुरु झाल्यावर एका दाम्पत्याने तातडीने ओला कॅबसाठी नोंदणी केली...दहा मिनिटातच कॅब हजर झाली..कोंढवा येथून कॅबने ते मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलकडे निघाले... परंतु...
पुणे: प्रसुती वेदना सुरु झाल्यावर एका दाम्पत्याने तातडीने ओला कॅबसाठी नोंदणी केली...दहा मिनिटातच कॅब हजर झाली..कोंढवा येथून कॅबने ते मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलकडे निघाले... परंतु प्रसुती वेदना असह्या होऊन कॅबमध्ये ही महिला प्रसूत झाली व तिने गोंडस मुलाचा जन्म दिला.
पुण्यातील कोंढवा परिसरात राहणारे रमेश व इश्वरी विश्वकर्मा या दांपत्याने हा थरारक अनुभव घेतला. ईश्वरी यांचे पहाटे पाच-साडे पाच पासूनच कळा येऊ लागल्या होत्या. वेदना वाढू लागल्याने त्यांनी तातडीने ओला कॅबसाठी नोंदणी केली. दहा मिनिटातच कॅब हजर झाली. प्रसुतीसाठी या दांपत्याने मंगळवार पेठ येथील कमला नेहरू रुग्णालयात नोंदणी केली होती. या रुग्णालयाच्या दिशेने कॅब जात असतानाच अर्ध्या रस्त्यातच प्रसुती वेदना वाढल्या. या परिस्थितीत कॅब चालक यशवंत गलांडे यांनी व कॅबमध्ये उपस्थित कुटुंबियांनी प्रसंगावधान दाखवत कॅबमध्ये इश्वरी यांची प्रसुती केली. कॅबमध्येच त्यांनी एका गोडस मुलाला जन्म दिला. या परिस्थितीतच प्रसुती झालेल्या महिलेला व बालकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. येथे उपस्थित डॉक्टरांनी देखील तातडीने पुढील सोपासकर उरकले व संसर्ग होऊ नये यासाठी उपचार सुरु केले. बाळ आणि आई दोघे सुखरूप आहेत.