खामगाव (जि. बुलडाणा) : दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांना राज्य शासनाने कोट्यवधीचे पॅकेज दिले. हा निधी काही शेतकर्यांपर्यंत पोहोचला, मात्र अनेक ठिकाणी बँकांनी अडवणुकीचे धोरण वापरल्यामुळे शेतकर्यांना पैसा मिळाला नाही. ही गंभीर बाब असून, अशा बँकांविरुद्ध आता थेट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संग्रमापूर तालुक्यातील लाडणापूर येथे दिली. खारपाणपट्टय़ाचा शाप असलेल्या तालुक्यांमध्ये दोन हजार धडक सिंचन विहिरी खोदण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यातील टुनकी, करमोडा आणि लाडणापूर तसेच मलकापूर तालुक्यातील खामखेड येथे भेटी दिल्या. प्रारंभी टुनकी येथे त्यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. येथे आयोजित कार्यक्रमात चुनखेडी, अंबाबरवा येथील पुनर्वसन करण्यात येणार्या १0 आदिवासींना प्रत्येकी २ लाख २0 हजार रकमेचे पासबुक व प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्यानंतर करमोडा येथे शेततळ्याची पाहणी करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकर्यांशी चर्चा केली, तर संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील आनंदराव सोनाजी दुदमल या आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गारपीट, अतवृष्टी तसेच दुष्काळी भागातील शेतकर्यांना राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचे पॅकेज दिले. हा पैसा बँकांच्या माध्यमातून वाटप करण्यात आला. अनेक बँकांनीच शेतकर्यांची अडवणूक करून पॅकेजचा लाभ दिला नाही. ही बाब गंभीर असून, अशा बँकांविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश आपण देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
..तर बँकांविरुद्ध एफआयआर दाखल करू - मुख्यमंत्री
By admin | Published: May 22, 2015 1:59 AM