शेतीला उद्योजकतेची जोड : दुष्काळी परिस्थितीत बदलाचे वारेरूपेश उत्तरवार - यवतमाळ कंपनी म्हटले की, डोळ्यापुढे उभा राहतो गर्भश्रीमंत वर्ग. आजपर्यंत याच वर्गाची कंपनी स्थापनेत मक्तेदारी राहिली. मात्र आता प्रक्रिया उद्योगासाठी शेतकरी पुढे आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतीशी निगडित प्रक्रिया उद्योग करणाऱ्या २४ कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत हे बदलाचे वारे निश्चितच आशादायी आहेत. शेतकरीच कंपनीचा मालक होणार असल्याने इतर शेतकऱ्यांची फसवणूक टाळल्या जाण्याची आशा आहे.यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. निसर्गाशी दोन हात करीत आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत बदल घडविण्याच्या उमेदाने काही शेतकरी पुढे आले. त्यांनी शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी चक्क कंपनीचीच स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून साठवणूक, प्रक्रिया आणि वितरणाचे काम केले जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कंपनी स्थापन केली त्या ठिकाणावरून व्यापारी स्वत: माल उचलणार आहे. त्यामुळे प्रक्रिया झालेल्या शेतमालास अधिक दर मिळेल, त्यातून अडते, मापारी आपसूकच बाद होतील. शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल. यवतमाळ जिल्ह्यात स्थापन झालेल्या २४ कंपन्यांमध्ये तूर डाळ तयार करणे, बाजारात विक्रीस जाणारे सोयाबीन, गहू स्वच्छ करणे, उडीद, मूग, चणा दाळ यावर प्रक्रिया करून ती बाजारात पाठविणे तसेच जिल्ह्यातील नैसर्गिक गूळ पॅकिंग करून बाजारात येणार आहे. थेट मार्केटिंग हातात घेतानाच गहू, ज्वारी, बाजरी यावर देखील प्रक्रिया केली जाईल. एवढेच नाही तर फळ आणि भाज्यादेखील पॅकिंग स्वरूपात बाजारात आणण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कंपनी स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प आणि आत्माने सहकार्य केले आहे. कंपनी स्थापन करण्यासाठी २० लाखापर्यंत अनुदान दिले जाते. अशा आहेत शेतकरी कृषी उद्योगाधारित कंपन्याकृषी समृध्दी ट्रेडिंग कंपनी, कळंब, भूमिपुत्र सेल्फ रिलायंट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, कळंब, संघर्ष अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, राळेगाव, मंथन अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, घाटंजी, नवजीवन अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, घाटंजी, यशोधरा प्रोड्युसर कंपनी घाटंजी, पैनगंगा अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, आर्णी, त्रिमूर्ती फार्मस प्रोड्युसर कंपनी, आर्णी, बळीराजा प्रोड्युसर कंपनी, बाभुळगाव, नवयुवक शेतकरी प्रोड्युसर कंपनी, वणी, बळीराजा प्रोड्युसर कंपनी, दिग्रस, तुळजाई अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, हिवरी संगम, उमरखेड तालुका शेतकरी उत्पादक कंपनी, अन्नपूर्णेश्वर प्रोड्युसर कंपनी, पन्हाळा, शेतकरी उत्पादक संघ, बोरगडी, दुधगिरी महाराज शेतकरी उत्पादक संघ, पुसद, भूमिपुत्र शेतकरी उत्पादक संघ, मुकुटबन, नवनिर्माण शेतकरी उत्पादक संघ, मुकुटबन, आप्पास्वामी शेतकरी उत्पादक संघ, पिंपळनेर, वसंतराव नाईक शेतकरी उत्पादक संघ, हुडी, सुधाकरराव नाईक उत्पादक संघ, हिवळणी, एकवीरा शेतकरी उत्पादक संघ, हिवरा, बळीराजा शेतकरी उत्पादक संघ, वसंतपूर.
शेतकऱ्यांनी स्थापल्या कंपन्या
By admin | Published: January 05, 2015 12:51 AM