भातसानगर/कसारा : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मनीषा दादू वारे (१२) या अल्पवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागला. तालुक्यातील पाणीटंचाईचा ती पहिला बळी ठरली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाजवळील माळ या गावी ही घटना घडली.तालुक्यात पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले असून सर्वच विहिरींनी तळ गाठला आहे. पाणी खूप खोल गेल्याने मनीषा विहिरीतून पाणी काढत असताना बरीच वाकली होती. विहिरीला कठडा नसल्याने पोहरा खेचताना तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडली. पाणी नसल्यामुळे दगडावर आपटून मरण पावली. वरकरणी हा अपघात वाटत असला तरी पाणीटंचाईमुळे हा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. (वार्ताहर) गावकऱ्यांचा संतापशहापूर तालुक्याच्या पाणीटंचाईमुक्तीसाठी गेल्या अनेक पंचवार्षिक योजनांत ठोस उपाययोजना केल्या, मात्र त्या सर्व कागदावरच राहिल्याने मनीषाचा अपघाती मृत्यू झाल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. आदिवासी योजनेच्या नावाखाली निधी मंजूर करून तो हडप केला जातो. परिणामी, यामध्ये तालुक्यातील आदिवासी गावपाडे आजही पाणीटंचाईला तोंड देत आहेत. पाणीटंचाईमुळेच हा अपघात झाल्याचे म्हणत गावकऱ्यांनी मनीषाच्या कुटुंबीयांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
पाणीटंचाईचा पहिला बळी
By admin | Published: May 11, 2015 4:30 AM