सापांच्या विष तस्करीतील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Published: December 28, 2016 09:42 PM2016-12-28T21:42:30+5:302016-12-28T21:42:30+5:30
सापांच्या विषाची तस्करीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता यात आणखी दोघांची नावे समोर आली
ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. 28 - सापांच्या विषाची तस्करीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता यात आणखी दोघांची नावे समोर आली आहेत. तर अटक आरोपी रणजित खारगे यावर विषाच्या तस्करीप्रकरणी मिरज आणि मुंबईमध्ये यापूर्वीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.चाकण मधील घरावर छापा टाकत ७१ विषारी साप आणि तीन बॉटल विष पोलीस आणि वन विभागाने ताब्यात घेत, या टोळीचे बिंग फोडले होते. तेव्हा यामध्ये मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.
त्या अनुषंगाने तपास सुरू केला असता यामध्ये दोघांची नावे समोर आली. सांगलीतील डॉ. कदम नामक इसम कडेगाव इथून विष घेऊन जात असे, तर दुसरी व्यक्ती पुण्यातून येऊन विष विकत घेत असे. मात्र या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही. यामध्ये लवकरच मोठ्या धेंड्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशमधील एक मोठी कंपनी विष खरेदी करत असल्याचे तपासात समोर आले. आत्ता पर्यंत ७५ लाख रुपयांपर्यंत विषाची विक्री केल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. परंतु यापेक्षा अधिक विक्री झाल्याचा अंदाज चाकण पोलिसांना आहे. अटकेत असलेले रणजित खारगे आणि धनाजी बेडकुटे सापांच्या विषाची तस्करी तीन वर्षांपासून करत आहे. चाकणमध्ये मात्र त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून ठाण मांडला होता. या तपासात कंपन्यासह बड्या डॉक्टरांची नावे या तस्करीत पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप अधिक तपास करीत असून उद्यापर्यंत अधिक माहिती हातात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.