लातूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास व्यापा-यांवर खटले दाखल केले जातील, असे निर्देश राज्य मंत्रिमंडळाने दिल्याने व्यापा-यांनी शेतमाल खरेदी करण्यास बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे मंगळवारी मार्केट यार्डात झेंडा फिरला; परंतु सौदा झाला नाही. परिणामी, जिल्ह्यातील अकराही बाजार समित्यांतील व्यवहार दुस-या दिवशीही ठप्प होते.हमीभावाने शेतमाल खरेदी करावा, असे निर्देश शासनाने बाजार समित्यांना दिले आहेत. मात्र व्यापारी हमीभावाप्रमाणे शेतमाल खरेदी करण्यास नकार देत चक्क खरेदी करणे बंद केले आहे. व्यापा-यांच्या या भूमिकेमुळे सध्या बाजार समित्या बंद आहेत. सध्या मुगाला ६ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव आहे. परंतु, बाजारात ४ हजार १०० रुपयांप्रमाणे मूग खरेदी केला जात आहे. एखाद्या शेतक-याने हमीभावाप्रमाणे मूग खरेदी झाला नाही, अशी तक्रार केली तर संबंधित व्यापा-यांवर खटले दाखल होऊन दंड व एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. या धास्तीमुळे व्यापा-यांनी खरेदी करणेच बंद केले आहे. जिल्ह्यातील लातूर, मुरुड, जळकोट, देवणी, अहमदपूर, औसा, शिरूर अनंतपाळ, चाकूर, निलंगा, रेणापूर, उदगीर या अकराही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेत शेतमाल खरेदी होऊ शकला नाही. सध्या बाजारपेठेत मुगाची आवक सुरू झाली आहे. शेतकरी मूग विक्री करून देणे-घेण्याची सारवासारव करीत असतो. शिवाय, श्रावण महिना चालू असून, पोळ्याचा सणही तोंडावर आहे. या सणाच्या खर्चासाठी शेतकरी मुगाची विक्री करीत असतो. परंतु, सध्या शासनाने व्यापारी आणि शेतक-यांमध्ये तेढ निर्माण करून कोंडीत पकडले आहे. वास्तविक पाहता हमीभाव जाहीर करणे आणि ती देण्याची जबाबदारी शासनाची असते. मात्र ती जबाबदारी व्यापा-यांवर ढकलून शासनाने व्यापा-यांत आणि शेतक-यांत भांडण लावण्याचा प्रकार केला असल्याचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणत आहेत.
बाजारभाव अन् हमीभावात तफावत... मुगाचा हमीभाव ६ हजार ९५० रुपये आहे. बाजारात ४ हजार १०० रुपयाला तो खरेदी केला जात आहे. हमीभाव आणि बाजारभावात अडीच हजारांची तफावत आहे. बहुतेक धान्याचा हमीभाव आणि प्रत्यक्ष बाजारात मिळणारा हमीभाव यातही तफावत आहे. मग अशावेळी खटले दाखल झाले तर ती मोठी यादी होईल. यापूर्वी हमीभावाने धान्य खरेदी न केल्यास व्यापा-यांना नोटिसा देणे, काही दिवसांसाठी त्यांचा परवाना रद्द करणे या अटी होत्या. पण आता मंत्रिमंडळाने नवीन अध्यादेश काढून व्यापा-यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे व्यापा-यांनी खरेदीवर बहिष्कार घातला आहे.
बाजार सुरू ठेऊन लढा द्यावा... हमीभाव देण्याची जबाबदारी शासनाचीच आहे. ती व्यापा-यांवर ढकलता येणार नाही. त्यामुळे व्यापा-यांनी बाजार बंद ठेवून शेतक-यांना अडचणीत आणू नये. बाजार चालू ठेवून आपला लढा चालू ठेवावा. शेतकरी संघटना तुमच्या सोबत राहील. बाजारपेठ बंद न करता न्याय मार्गाने लढा लढावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केले आहे.