मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: न्यू दिंडोशी म्हाडा वसाहत ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत आहे. सुमारे 103 किमीच्या या परिसरात सुमारे 51 बिबटे आहेत. भटकी कुत्री हे बिबट्यांचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे भटकी कुत्री पाळू नका, आपला परिसर स्वच्छ ठेवा, बिबट्यांपासून संरक्षण करा असे आवाहन आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीच्या नागरिकांना केले.
गेल्या मंगळवारी चक्क दुपारी 1.30 वाजता बिबट्या शिकार केलेल्या कुत्र्याला घेऊन इमारत क्रमांक 5 गिरीकुंज सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीवरून जातांना येथील नागरिकांनी व लहान मुलांनी पाहिला होता. त्याआधी तीन दिवस मध्यरात्री येथे बिबट्या येत होता. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
लोकमत ऑनलाईन आणि लोकमतच्या अंकात सलग दोन दिवस या संदर्भात वृत्त दिले होते. लोकमतचे वृत्त सोशल मीडियावर, आणि याभागात व्हायरल झाले. तर शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आणि वन विभागाच्या सचिवांशी संपर्क साधून बिबट्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी जातीने लक्ष घालण्याची मागणी केली.
बिबट्या पासून आपले संरक्षण करावे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आज सकाळी गिरीकुंज सोसायटीत वन खात्याचे अधिकारी आणि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी आले होते. येथील रहिवासी डॉ.रामेश्वरी पाटील यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी वन विभागाचे अधिक्षक विजय बाटबरे,रेस्क्यू टीम सदस्य प्राणी रक्षक महेश मोरे व वैभव पाटील, संतोष कंक -वनक्षेत्रपाल मुंबई, एस.बी.पाटील-वनरक्षक गोरेगाव, अभिजित पाटील-वनरक्षक-दादर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मदत करणारे मुंबईकर सितू सिंह, आणि कृपा पाटील या मान्यवरांनी सुमारे दोन तास बिबट्या पासून आपले सरंक्षण कसे करायचे याबाबत सविस्तर माहिती दिली. तर यावेळी लहान मुले आणि नागरीकांच्या प्रश्नांना त्यांनी संमर्पक उत्तरे दिली.
बिबट्या हा अत्यंत लाजाळू, मानवाशी मुख्यतः संपर्क टळणारा प्राणी आहे. बिबट्या हा 20 फूट उंच उडी मारू शकतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात त्याला पोषक वातावरण आणि खाद्य मिळत असले तरी तो मानवी वस्तीत खाद्य सहज उपलब्ध होत असल्याने तो मानवी वस्तीत विशेष करून अंधारात मध्यरात्री, पहाटे येतो. मानवावर तो सहसा हल्ला करत नाही. भटकी कुत्री पाळू नका,आपला ग्रूप करून नागरिकांचे प्रबोधन करून भटक्या कुत्रे पाळू नका असे आवाहन करा,भटक्या कुत्र्यांची चेन ब्रेक केल्यावर त्याला खाद्य मिळाले नाही तर मग मानवी वस्तीत मग बिबट्या येणार नाही अशी माहिती त्यांनी दिली.
आपला परिसर स्वच्छ ठेवा,कुत्र्यांना बाहेर रस्त्यावर फिरवतांना एका हातात काठी घेऊन आवाज करा,मग बिबट्या घाबरून येणार नाही. तसेच लहान मुलांना संध्याकाळी आपल्या सोसायटीच्या मागील बाजूस संरक्षक भिंतीजवळ बाहेर एकटे पाठवू नका,आपल्या इमारतीच्या मागील बाजूस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने प्रखर झोताचे दिवे लावा अश्या अनेक म्हत्वाच्या टिप्स या मान्यवरांनी दिल्या. तर येथील खाजगी बांधकाम व्यवसायीकाचे येथे इन्फिनिटी आयटी पार्क असून येथे मजबूत संरक्षक भिंत बांधण्यासाठी त्यांच्या कडे आग्रही मागणी करा अशी सूचना डॉ.रामेश्वरी पाटील यांनी वन अधिकाऱ्यांना केली.