... ही शिवसेना-काँग्रेसची नुरा कुस्ती; औरंगाबादच्या नामांतरावरून फडणवीसांचा टोला
By जयदीप दाभोळकर | Published: January 1, 2021 02:22 PM2021-01-01T14:22:44+5:302021-01-01T14:25:13+5:30
निवडणुका जवळ आल्या की शिवसेनेला या मुद्द्याची आठवण येते. निवडणुका संपल्या की त्यांना विसर पडेल असं म्हणत फडणवीसांची शिवसेनेवर टीका
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. निवडणुका जवळ आल्या की शिवसेनेला या मुद्द्याची आठवण येते आणि निवडणुका संपल्या की त्यांना या मुद्द्याचा विसर पडेल, असंही त्यांनी नमूद केलं. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी फडणवीस यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याविषयावर भाष्य केलं.
यावेळी फडणवीसांनी काँग्रेसच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. काँग्रेसनं औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराला विरोध केला किंवा नाही केला काय, पण शिवसेनेकडून केवळ निवडणुकांपुरता हा मुद्दा वापरण्यात येतो. या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये नुरा कुस्ती सुरू असल्याचंही फडणवीस म्हणाले.
काँग्रेसचा विरोध
महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण अद्याप तसा कोणताही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याच आधारावर तयार झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतराला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब ठाकरेंनी ठामपणे सांगितलं होतं.
मनसेची मागणी
शिवसेना हा पक्ष गेल्यावेळी केंद्रात आणि राज्यात सत्तेत होता. मात्र असे असतानासुद्धा औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावं यासाठी त्यांनी कुठलाही आवाज उठवला नाही. तर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून शिवसनेनं फक्त राजकरण केले आहे. त्यामुळे आता लोकांना याबातीत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नसल्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं होतं. तसंच आता आम्ही यासाठी पुढाकर घेणार असून राज्य सरकाराला औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी भाग पाडणार असल्याचेही पाटील यांनी म्हटलं होतं.