समीरसह चौघांची ‘इन कॅमेरा’ चौकशी

By admin | Published: September 19, 2015 12:35 AM2015-09-19T00:35:17+5:302015-09-19T00:41:48+5:30

महत्वाचे धागेदोरे हाती : तपास प्रमुख संजयकुमार कोल्हापूरात तळ ठोकून; संशयितांकडे कसून चौकशी

Four cameras 'in camera' inquiry with Samir | समीरसह चौघांची ‘इन कॅमेरा’ चौकशी

समीरसह चौघांची ‘इन कॅमेरा’ चौकशी

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यासह ताब्यात घेतलेल्या त्याच्या प्रेयसीसह दोघा जवळच्या नातेवाइकांची ‘इन कॅमेरा’ चौकशी सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीमध्ये पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.
तीन दिवसांपासून तपास प्रमुख व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. पोलीस मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कक्षामध्ये संशयित गायकवाड याला ठेवण्यात आले आहे; तर त्याच्या प्रेयसीसह दोघा नातेवाइकांना तिसऱ्या मजल्यावरील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्षात ठेवले आहे. या दोन्हीही कक्षांमध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी संशयितांकडे कसून चौकशी सुरू होती. संशयितांना विचारलेल्या प्रश्नांसह त्यांनी दिलेल्या उत्तरांची थेट संगणकावर नोंद केली जात होती. तसेच या चौकशीचे व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे. जितके भक्कम पुरावे गोळा करता येतील, त्या दृष्टीने पोलीस प्रयत्न करीत आहेत. (प्रतिनिधी)

अशी होतेय चौकशी...
तपासप्रमुख संजयकुमार हे शासकीय विश्रामगृहावर गेल्या तीन दिवसांपासून वास्तव्यास आहेत. ते सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत पोलीस मुख्यालयात बसून तपासाची माहिती घेतात. त्यानंतर पुन्हा सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत संशयितांकडे चौकशी करतात. त्यानंतर आरोपीला जेवण दिल्यानंतर पुन्हा त्याच्याकडे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व अन्य अधिकारी, कर्मचारी मध्यरात्री दोनपर्यंत चौकशी करतात. त्यानंतर संशयितांना झोपण्यास सांगून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नऊनंतर चौकशीला सुरुवात होते.संशयितांसोबत व आजूबाजूला चोवीस तास आठ ते दहा सध्या वेशातील सशस्त्र कर्मचारी आजूबाजूला लक्ष ठेवून आहेत. लघुशंकेसाठी व शौचालयास जाताना त्यांच्यावर चौघे पोलीस पाळत ठेवून असतात. संशयित गायकवाडच्या प्रेयसीकडे सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील चौकशी करीत आहेत.

जेवणासह चहा-नाष्ट्याची सोय --संशयित समीर गायकवाडसह त्याच्या प्रेयसीला दोनवेळचे जेवण, चहा-नाष्टा पोलिसांकडून पुरविला जात आहे. गायकवाड याची रोजच्या रोज वैद्यकीय तपासणी केली जात आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गायकवाडच्या प्रेयसीसह तपास अधिकाऱ्यांना महिला कॉन्स्टेबल चहा घेऊन जात होती; परंतु प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दिसताच तिने पुन्हा मागे वळून दुसऱ्या कॉन्स्टेबलकडून चहा आत पाठविला.

‘सायबर सेल’चे पथक पुण्याला परतले--पुणे येथील ‘सायबर सेल’चे चौघा तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले होते. संशयित गायकवाड याच्याकडून २३ मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलवरून व ई-मेल आणि फेसबुकवरून त्याने आतापर्यंत कोणते संदेश (मेसेज) पोस्ट केले आहेत, त्याची माहिती या पथकाने पोलीस मुख्यालयातील सायबर सेलमध्ये बसून तपासली. त्यामधील काही माहिती सोबत घेऊन ते दुपारी पुण्याला परतले.

Web Title: Four cameras 'in camera' inquiry with Samir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.