मंत्रालयातील चारशे जणांनी अवघ्या तीन दिवसात केला अवयवदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 09:28 PM2017-09-01T21:28:38+5:302017-09-01T21:30:52+5:30
अवघ्या तीन दिवसात मंत्रालयातील चारशे जणांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे.
मुंबई, दि. 1 - अवघ्या तीन दिवसात मंत्रालयातील चारशे जणांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. अशा प्रकारचा हा एक विक्रम असावा. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या अवयवदान चळवळीला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी २९ तारखेला अवयवदान दिवस साजरा झाला. जे. जे. महाविद्यालय, ग्रॅन्ट रुग्णालय, खासगी तसेच शासकीय वैद्यकीय व्यवसायातील व्यक्ती, आयएमएसारख्या संस्था आणि इतर मान्यवर नागरिकांची मानवी साखळी तयार करण्यात आली होती.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात अवयवदान जनजागृतीविषयक पोस्टर प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. यासोबतच अवयवदान नोंदणी केंद्रही उभारण्यात आले होते. या केंद्राचे व्यवस्थापन जीवन विद्या मिशनच्या झोनल ट्रान्सप्लॅन्ट को आडीर्नेशन सेंटरद्वारे करण्यात आले. मंत्रालयातील चारशे जणांनी अवयवदान संकल्प अर्ज भरुन दिले. यामध्ये ६५ टक्के ४५ वषार्खालील आहेत. त्याशिवाय आपल्या कुटुंबातील व्यक्तींकडून अर्ज भरुन घेण्यासाठी प्रत्येकाने ३ ते ४ अर्ज घरी नेले आहेत. या केंद्रावर वरिष्ठ अधिकारी ते चतुर्थ श्रेणी कर्मचा?्यांनी नोंदणी केली. यात गृह विभागाचा सहभाग अधिक आहे. पोलीस उपायुक्त ते पोलीस शिपाई सर्व श्रेणीतील लोकांनी यात सहभाग नोंदविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी यापूर्वीच अवयवदानाचा संकल्प केला आहे.
एखाद्या व्यक्तीस मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे दान करण्याची इच्छा असल्यास संमतीपत्र भरून या पत्रावर जवळच्या नातेवाईकाची सही घेऊन नजिकच्या नोंदणी केंद्रावर द्यावे. त्यानंतर मिळणारे डोनर कार्ड सतत सोबत ठेवावे. आपल्या डोनर कार्डविषयी आपल्या जवळच्या नातेवाईकास अवगत करून ठेवावे. अवयव निकामी झाल्याने मरणाच्या दारावर उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना आपला संकल्प आशेचा किरण ठरणार आहे.