तेल्हारा (जि. अकोला): शेतीच्या कौटुंबिक वादावरून तालुक्यातील मालपुरा येथील चर्हाटे कुटुंबातील दोन भाऊ व एका भावाच्या दोन मुलांवर सख्ख्या बहिणीसह जावई व त्याच्या दोन मुलांनी कुर्हाड, गुप्ती व चाकू या शस्त्रांनिशी हल्ला करून त्यांना जागीच ठार केल्याची घटना रविवार, २८ जून रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेत दहीहांडा पोलीस स्टेशनमधील एक पोलीस कॉन्स्टेबल, त्याची दोन मुले व मोठा भाऊ अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकोटहून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. मालपुरा येथील बाबूराव सुखदेव चर्हाटे, दहीहांडा पोलीस स्टेशनमधील पोलीस कॉन्स्टेबल धनराज सुखदेव चर्हाटे या दोघांशी त्यांची सख्खी बहीण उज्ज्वला ऊर्फ बारकूबाई हरिभाऊ तेलगोटे हिचा वडिलोपाजिर्त शेतजमिनीच्या हिस्सेवाटणीवरून वाद असून, हे प्रकरण मागील दोन वर्षांपासून न्यायालयात सुरू आहे. या वादावरून चर्हाटे व तेलगोटे कुटुंबीयात वितुष्ट निर्माण झाले होते. याच वादाच्या कारणावरून आकोटहून उज्ज्वला ऊर्फ बारकूबाई तेलगोटे, हरिभाऊ राजाराम तेलगोटे, श्याम हरिभाऊ तेलगोटे व मंगेश हरिभाऊ तेलगोटे असे चौघेजण रविवारी सायंकाळी ऑटोरिक्षातून मालपुरा गावात बाबूराव चर्हाटे यांच्या घरी आले. त्यांनी बाबूराव चर्हाटे (५९), धनराज चर्हाटे (५0), शुभम धनराज चर्हाटे (२0) व गौरव धनराज चर्हाटे (१९) या चौघांवर कुर्हाड, गुप्ती व चाकू या शस्त्रांनिशी अचानक हल्ला करून असंख्य वार केले. या हल्लय़ामुळे ते चौघेही घटनास्थळीच ठार झाले. त्यानंतर चारही आरोपी घटनास्थळावरून ऑटोरिक्षातून पसार झाले. या घटनेची माहिती मालपुराचे पोलीस पाटील किरण संतोष ठाकरे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तातडीने दिली. त्यावरून हिवरखेडचे ठाणेदार भास्कर तंवर व तेल्हाराचे पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ भास्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेनंतर सायंकाळी ७ वाजता आकोट पोलिसांनी आकोट येथून चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. तथापि, हे वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शेतीच्या वादातून चौघांचा खून
By admin | Published: June 28, 2015 11:22 PM