‘स्मार्ट सिटी’साठी फ्रान्सचे सहकार्य
By admin | Published: December 4, 2014 12:46 AM2014-12-04T00:46:35+5:302014-12-04T00:46:35+5:30
देशातील ‘स्मार्ट सिटी’मध्ये नागपूर शहराचा समावेश व्हावा, या दृष्टीने राबवावयाच्या विकास प्रकल्पासंदर्भात महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांची फ्रान्सचे मुंबई येथील काउन्सलेट जनरल यांच्या
प्रकल्पांचे सादरीकरण : महापौर, आयुक्तांशी शिष्टमंडळाची चर्चा
नागपूर : देशातील ‘स्मार्ट सिटी’मध्ये नागपूर शहराचा समावेश व्हावा, या दृष्टीने राबवावयाच्या विकास प्रकल्पासंदर्भात महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांची फ्रान्सचे मुंबई येथील काउन्सलेट जनरल यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधीसोबत बुधवारी चर्चा केली.
मनपा मुख्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत काउन्सलेट जनरल जॉ राफेल पेत्रेग्ने याच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, आयुक्त श्याम वर्धने व पदाधिकारी यांच्यात स्मार्ट सिटीसंदर्भात चर्चा झाली. फ्रान्समधील पाच कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रकल्पांचे सादरीकरण केले. मेट्रो रेल्वे, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, विमान सेवा आदी प्रकल्पांसाठी मनपाला तांत्रिक व आर्थिक मदत मिळावी, अशी भूमिका मनपाच्या वतीने मांडण्यात आल्याची माहिती महापौरांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील लोकांना उपयुक्त होईल असा विकास साध्य व्हावा, गरजू व गरीब लोकांना निवासी गाळे उपलब्ध करता येईल का, याची चाचपणी करण्यात आली. गेल्या आॅक्टोबर महिन्यात फ्रान्सचे काउन्सलेट यांनी मनपाला भेट दिली होती. त्यावेळी शहर विकासाच्या प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात माहिती देण्यात आली होती. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या नागपूर शहराची संभाव्य गरज विचारात घेता प्रकल्प राबविण्यासंंदर्भात चर्चा करण्यासाठी फ्रान्समधील कंपन्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. यात फ्रान्सच्या युबीआयचे असिस्टंट कमिश्नर सिल्वा बियार्ड, आय.एफ.सी.सी.आय.च्या जनरल सेक्रेटरी लारा प्रसाद, प्रेसिडेन्ट पीअर बेन्हम, फॅबिया बोन्दयो, फॅकीन्स ईलेन कंपनीचे अभिजित गावळे, व्हिओलिया कंपनीचे जोगनासू मेहता, व्हेरीसचे विलास मेश्राम आदींचा यात समावेश होता.
यावेळी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, अप्पर आयुक्त हेमंतकुमार पवार, नीता ठाकरे, सुनील अग्रवाल, अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, नगरयंत्री संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता अजीर्जूर रहेमान, सहायक आयुक्त प्रकाश वराडे आदी उपस्थित होते. संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी तर आभार उराडे यांनी मानले.(प्रतिनिधी)
फ्रान्सला हवेत भारतीय विद्यार्थी
फ्रान्समध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर चांगल्या शैक्षणिक संस्था असून भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे पेत्रेग्ने यांनी सांगितले. चीनमध्ये आजच्या तारखेत ३० हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहे. फ्रान्समध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा आकडा हा ३ हजारांच्या जवळपास आहे. फ्रान्समध्ये फ्रेंच भाषेतील शिक्षणाला महत्त्व दिले जाते. त्यामुळे भारतीय विद्यार्थी तिकडे येण्यास फारसे इच्छुक नसतात. परंतु विद्यापीठ, शाळा व महाविद्यालयांत इंग्रजीत शिक्षण देण्याची परवानगी देणाऱ्या कायद्याला फ्रेंच सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे नक्कीच विदेशातील विद्यार्थ्यांची संख्या वाढेल असेदेखील पेत्रेग्ने म्हणाले. यासोबतच विद्यार्थ्यांना सुलभतेने ‘व्हिसा’ मिळावा यासाठीदेखील शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच काम करण्याचीदेखील संधी मिळू शकते. जो विद्यार्थी फ्रान्समधील विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेईल त्याला मोफत ‘लाईफटाईम व्हिसा’ देण्यासंदर्भातदेखील विचार सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली. फ्रेंच भाषेच्या शैक्षणिक सल्लागार अमृता दातार यांनी शहरातील निरनिराळ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची बुधवारी भेट घेतली व नवीन संधींबाबत माहिती दिली.
तंत्रज्ञान घेण्याचा विचार
फ्रान्समधील कंपन्यांकडून ई-गव्हर्नन्स, वायफाय सिटी व जीएस प्रकल्पासाठी तंत्रज्ञान घेण्याचा मनपाचा विचार आहे. या बाबी स्मार्ट सिटीकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक आहेत. वायफाय सिटी प्रकल्पासाठी २०० तर जीएस प्रकल्पावर ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
ंउपराजधानीतील व्यापारिक संधींचा शोध
फ्रान्सच्या शिष्टमंडळाने विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेतली. नागपूर व फ्रान्सदरम्यान निरनिराळ्या व्यापारिक तसेच उद्योगक्षेत्राशी निगडीत संधी वाढाव्यात तसेच कुठल्या क्षेत्रात एकत्रितपणे काम करता येईल यासाठी या भेटीत चर्चा झाली. नागपूरच्या उद्योगक्षेत्रात फ्रान्सचा सहभाग तसेच नागपुरातील कंपन्यांकडून फ्रान्समध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात काय प्रयत्न करण्यात येतील यावरदेखील प्रकाश टाकण्यात आला.