मंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By admin | Published: December 30, 2015 09:59 AM2015-12-30T09:59:05+5:302015-12-30T17:23:20+5:30

आपल्या कवितांनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे मराठीतील ज्येष्ठ कवी व साहित्यिक मंगेश पाडगावकर यांच्यावर बुधवारी संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Funeral for government officials on Mangesh Padgaonkar | मंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या गाण्यातून रसिकांना आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे मराठीतील महान कवी  आणि साहित्यिक मंगेश पाडगावकर यांच्यावर बुधवारी संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाडगावकर यांचे बुधवारी सकाळी वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. 
सहज सोप्या भाषेतील जगण्याची प्रेरणा देणा-या कवितांमधून पाडगावकरांनी रसिकांच्या हृद्यावर अधिराज्य गाजवले.  'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे', 'भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी', ' प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं',  'शुक्रतारा मंदवारा' ही त्यांची गाणी विशेष गाजली. आजही ही गाणी अनेक रसिक गुणगुणताना दिसतात. त्यांच्या सलाम या कवितासंग्रहासाठी १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. 
 
कोकणातील वेंगुर्ला येथे १०  मार्च १९२९ साली मंगेश पाडगावकर यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुईया महाविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवत होते. वयाच्या १४ व्या वर्षी पाडगावकरांनी कविता लेखनाला सुरुवात केली. 'तुज पहिले हे पुष्प हृदयातले' ही त्यांची पहिली कविता. ७० वर्षांहून अधिक काळ त्यांनी कविता लेखन केले. प्रसिध्द कवी विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्यासह १९६०-७० च्या दशकात महाराष्ट्राच्या विविध भागात झालेल्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात पाडगावकर सहभागी झाले. पाडगावकरांनी अनेक मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहीली. '
 
मंगेश पाडगावकरांची सलाम कविता त्यांच्याच तोंडून...
 
 
साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी २०१२ साली पुणे विद्यापीठाने त्यांना जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. २०१० साली दुबईमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आयोजित केलेल्या दुस-या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. काव्य, साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये राज्याच्या सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले. 
 
पाडगावकरांनी मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद केलेला मीरा काव्यसंग्रह १९६५ मध्ये प्रकाशित झाला. त्याचबरोबर त्यांनी कबीर, सूरदास यांच्या कामाचेही मराठीमध्ये अनुवाद केला. शेक्सपियरची प्रसिध्द नाटकांचेही मराठीत भाषांतर केले. त्यांनी केलेले बायबलचे भाषांतर २००८ मध्ये प्रकाशित झाले. मंगेश पाडगावकरांनी दुस-या भाषांमधील प्रसिध्द साहित्यकृतींचे भाषांतर केले तसेच त्या पुस्तकांसाठी प्रस्तावनाही लिहीली. शोध कवितांचा या पुस्तकातून त्यांनी कविता लेखनाचे अनुभव लिहीले. 
 
पाडगावकर यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.  महाराष्ट्राला प्रेम शिकविणारा कवी हरपला, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. २०१३ साली पाडगावकर यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 
 

Web Title: Funeral for government officials on Mangesh Padgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.