गडचिरोलीत १५.१४ तर नंदूरबारमध्ये २२.११ टक्के लोकांना नळाद्वारे पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 02:34 AM2018-07-20T02:34:02+5:302018-07-20T02:34:43+5:30
एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रातील आदिवसीबहुल अशा गडचिरोली जिल्ह्यात नळाद्वारे केवळ १५.१४ टक्के तर नंदूरबारमध्ये २२.११ टक्के लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रातील आदिवसीबहुल अशा गडचिरोली जिल्ह्यात नळाद्वारे केवळ १५.१४ टक्के तर नंदूरबारमध्ये २२.११ टक्के लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबत सर्वात शोचनीय परिस्थिती बिहारमधील जमुई जिल्ह्याची असून तिथे अवघ्या १.२७ टक्के लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा होतो.
उस्मानाबाद व वाशिममध्ये मात्र तुलनेने बरी स्थिती असून तिथे अनुक्रमे ७३.८२ टक्के व ७४.८९ टक्के लोकांना नळाने पाणीपुरवठा केला जातो. उत्तर प्रदेश, राजस्थान, ओदिशा तसेच नक्षलग्रस्त छत्तीसगढ, झारखंड या राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. याबाबत सीतेचे जन्मस्थळ मानल्या जाणाऱ्या सीतामढी जिल्ह्यासह बिहारमधील १२ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्येही विदारक स्थिती आहे. सीतामढीत ४.२५ टक्के तर वैशाली-मुजफ्फरपूरमध्ये २.८४ टक्के लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या एका दस्तावेजात ही माहिती देण्यात आली आहे.